रोज सकाळी उठून ब्रेकफास्टला काय करायचं असा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोरच असतो. सारखं पोहे, उपीट खाऊनही आपल्याला कंटाळा आलेला असतो. सकाळच्या घाईत झटपट होणारे आणि तरीही सगळ्यांना आवडतील असे पदार्थ करायचे म्हणजे तारेवरची कसरत असते. एकीकडे स्वयंपाक, बाकीची आवराआवरी आणि त्यात ब्रेकफास्ट. रात्रीचे काही उरले असेल तर त्याची विल्हेवाट लावणं हा आणखी एक टास्क असतो (Appe From Leftover Rice Breakfast Recipe).
काही वेळा पोळ्या उरतात तर काही वेळा रात्री केलेला भात उरतो. भात उरला की आपण त्याचा फोडणीचा भात करतो किंवा दूध घालून तो भात खाऊन टाकतो. पण या उरलेल्या भाताचे अतिशय चविष्ट असे आप्पे केले तर हा भातही संपतो आणि वेगळा पदार्थ केल्याने घरातलेही सगळे खूश होतात. विशेष म्हणजे हे आप्पे उरलेल्या भाताचे केलेत हेही खाणाऱ्यांना समजणार नाही. तर पाहूयात ही खास रेसिपी नेमकी कशी करायची.
साहित्य -
१. शिळा भात - १ वाटी
२. रवा - अर्धी वाटी
३. दही - पाव वाटी
४. कांदा - १
५. शिमला मिरची - १
६. गाजर - १
७. मीठ - चवीनुसार
८. तिखट - अर्धा चमचा
९. चाट मसाला - अर्धा चमचा
१०. तेल
कृती -
१. राहिलेला भात, रवा आणि दही मिक्सरमध्ये बारीक करुन घ्यायचे. आवश्यकतेनुसार पाणी घालायचे आणि एकसारखे पीठ होईल असे करायचे.
२. कांदा, ढोबळी बारीक चिरुन आणि गाजर किसून या मिश्रणात घालायचे.
३. यामध्ये मीठ, तिखट, चाट मसाला घालून मिश्रण एकजीव करुन घ्यायचे.
४. आप्पे पात्रात तेल घालून त्यामध्ये पीठ घालून आप्पे दोन्ही बाजुने आप्पे खरपूस भाजून घ्यायचे.
५. हे आप्पे सॉस, हिरवी चटणी, दही कशासोबतही अतिशय छान लागतात.