Join us  

प्रमाणात खाल्ले तर उपाय नाहीतर अपाय; साबुदाणे जास्त खाण्याचे तोटे माहिती आहेत ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2022 7:23 PM

तज्ज्ञ म्हणतात आरोग्यास फायदेशीर ठरणारे साबुदाणे चुकीच्या प्रमाणात खाल्ल्यास अनारोग्यास स्वत:हून आमंत्रण देण्यासारखं आहे!

ठळक मुद्देमधुमेह असल्यास तो नियंत्रित ठेवण्यासाठी आणि पुढे आयुष्यात मधुमेहाचा धोका टाळण्यासाठी साबुदाणा प्रमाणातच खायला हवा.ज्यांना छातीत, पोटात जळजळ होते त्यांनी आहारात साबुदाण्याचं प्रमाण कमी करायला हवं.साबुदाण्याचं अति प्रमाणात सेवन केल्यास वजन वाढीचा धोका उद्भवतो. 

उपवासाला मुख्य पदार्थ म्हणून साबुदाण्याला आहारत महत्त्व आहे. उपवास हा आठवड्यातून एक दोनदा किंवा महिन्यातून दोन तीन वेळा असतो. तितक्या वेळेस वेगवेगळ्या स्वरुपात साबुदाणे खाल्ल्यास त्याचा फायदा होतो . पण साबुदाणा आवडतो म्हणून तो आठवड्यातून कितीही वेळा खाऊन नाही चालत. प्रमाणापेक्षा जास्त साबुदाणे खाणं हे आरोग्यासाठी अपायकारक असल्याचं तज्ज्ञ सांगतात. साबुदाण्यात प्रथिनं, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फायबर, ऊर्जा, कर्बोदकं, झिंक, फाॅस्फरस, पोटॅशियम गुणधर्म असतात. या गुणधर्मांमुळे साबुदाणे आरोग्यास लाभदायी समजले जातात. पोट बिघडल्यास, जुलाब होत असल्यास पोट आवळून येण्यासाठी, जुलाब थांबण्यासाठी साबुदाण्याची खीर खाणं फायदेशीर मानलं जातं. पण प्रमाणापेक्षा साबुदाणे जास्त  खाणं म्हणजे अनारोग्यासस्वत:हून आमंत्रण दिल्यासारखं होतं. त्यामुळे साबुदाणे  प्रमाणात खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. 

साबुदाण्याचे अपाय

1. मधुमेहाच्या आजारात साबुदाण्याचं जास्त सेवन अपायकारक मानलं जातं. साबुदाण्यात कर्बोदकांचं प्रमाण जास्त असतं. साबुदाण्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो.  साबुदाणा खाल्ल्यानं रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं. त्यामुळे मधुमेह असल्यास तो नियंत्रित ठेवण्यासाठी आणि पुढे आयुष्यात मधुमेहाचा धोका टाळण्यासाठी साबुदाणा प्रमाणातच खायला हवा. 

Image: Google

2. वाढलेलं वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर  डाएटमध्ये साबुदाणा आणि साबुदाण्याचे पदार्थ टाळायला  हवेत असं तज्ज्ञ सांगतात. साबुदाण्यात कॅलरीजच्ं प्रमाण जास्त असतं. जास्त उष्मांक असलेल्या पदार्थांमुळे वजन वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे वजन वाढत असल्यास, वाढलेलं वजन कमी करण्याचा  प्रयत्न सुरु असल्यास आहारात साबुदाण्याचं प्रमाण अत्यल्प असणं किंवा साबुदाण्याचा समावेश आहारात नसणं हे जास्त फायदेशीर ठरतं. वजन जास्त असणाऱ्यांनी जास्त प्रमाणत साबुदाणा खाल्ल्यास ह्दयाशी संबंधित आजरांचा धोका वाढतो. 

Image: Google

3. साबुदाणा भाजून त्याची खीर केल्यास किंवा साबुदाणा भाजून पीठ करुन साबुदाण्याचे पदार्थ केल्यास ते पचायला सहज जातात. मात्र वारंवार खिचडी, वडे  यास्वरुपात बटाटा मिसळून साबुदाणा खाल्ल्यास पोट फुगल्यासरखं वाटणं,  बध्दकोष्ठतेची समस्या निर्माण होणं या समस्या निर्माण होतात.  पित्त प्रकृती असणाऱ्यांनी , ज्यांना छातीत, पोटात जळजळ होते त्यांनी आहारात साबुदाण्याचं प्रमाण कमी करायला हवं. 

4. मूतखड्याची समस्या असलेल्या रुग्णांना आहारात काही पदार्थ खाण्यास मनाई केली जाते. त्यात साबुदाण्याचा देखील समावेश आहे. साबुदाण्यातील कॅल्शियमचं प्रमाण जास्त असल्यानं मूतखड्याची समस्या वाढण्याचा धोका जास्त असतो. 

Image: Google

5. साबुदाण्यात कमी प्रमाणात का होईना पण सायनाइडचा अंश असतो. त्यामुळे वांरवार जास्त प्रमाणात साबुदाणा खाल्ल्यास मेंदू आणि हदयाच्या आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम होतो. दम लागणं, मळमळणं, उलटी होणं, रक्ताचे विकार उद्भवणं, डोकेदुखी होणं हे त्रास साबुदाण्याचं  अति प्रमाणात सेवन केल्यास उद्भवतात.  

टॅग्स :अन्नहेल्थ टिप्सआहार योजना