Join us  

भात चुकीच्या पध्दतीने तर तुम्ही शिजवत नाही? पोषक तत्त्व उडू न देता कसा शिजवाल भात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 4:22 PM

भात शिजवण्याची आणि खाण्याची योग्य पध्दत समजून घेतली तर भात आरोग्यासाठी चांगला की वाईट, भातानं वजन वाढतं का, डाएट करताना भात सोडावा का यासारखे प्रश्न निकालात निघतील.

ठळक मुद्दे प्रेशर कुकरमधे भात शिजवल्याने भातातला स्टार्च टिकून राहातो. त्यामुळे भात खाल्ला की भरपूर वेळ पोट भरल्यासारखं राहातं.आरोग्यतज्ज्ञ म्हणतात की भातानं वजन वाढू नये म्हणून भातासोबत फायबर युक्त भाज्या खाव्यात.भात शिजवताना त्यातील पाण्यात थोडं खोबर्‍याचं तेल घालावं. यामुळे भातातील प्रतिरोधक स्टार्चचं प्रमाण वाढतं आणि कॅलरीजचं प्रमाण कमी होतं.

भात खाण्याशी निगडित जितके समज गैरसमज आहेत तितके कोणत्याच पदार्थाविषयी नसतील हे नक्की. भात कधी खावा सकाळी का रात्रीच्या जेवणात? भात बाहेर भांड्यात शिजवलेला चांगला की कुकरमधे शिजवायला हवा? भात थोडा खावा की जास्त? नुसता भात खावा की भातासोबत इतर पदार्थही खावेत? भातानं वजन वाढतं ते खरं की खोटं, वजन कमी करायचं असेल तर भात सोडावाच लागतो का? एक ना अनेक प्रश्न भाताविषयी छळत असतात. भात शिजवण्याची आणि खाण्याची योग्य पध्दत समजून घेतली तर यावरील प्रश्नांची उत्तरं तर मिळतीलच शिवाय भाताबद्दल इतर प्रश्न पडणंही बंद होईल.

छायाचित्र- गुगल

भात कुकरमधे शिजवला तर

एकूणच आरोग्याचा विचार करता कुकरमधे शिजवलेलं अन्न आरोग्यासाठी फायदेशीर असतं. प्रेशर कुकरमधे भात शिजवल्याने भातातला स्टार्च टिकून राहातो. त्यामुळे भात खाल्ला की भरपूर वेळ पोट भरल्यासारखं राहातं. त्यामुळे अशा भातानं वजन वाढत नाही उलट कमी होतं. कारण भात खाल्ल्यानंतर पोट भरलेलं राहात असल्यानं पुन्हा सारखं सारखं खाण्याची इच्छा होत नाही. तसेच कुकरमधे भात शिजवताना तांदळात तूप किंवा तेल घालावं लागत नाही. त्यामुळे अशा पध्दतीने शिजवलेल्या भातातून शरीरात अनावश्यक कॅलरीज जात नाही. वजन वाढवण्यासाठी भात खायचा असल्यास भात शिजवताना त्यात तूप घालावं असं आहार तज्ज्ञ सांगतात.

छायाचित्र- गुगल

कुकरमधे भात शिजवल्यानं तो कमी वेळात शिजतो. त्यामुळे तो कमी वेळ अग्नीच्या संपर्कात राहातो. यामुळे भातातील सर्व पौष्टिक गुणधर्म टिकून राहातात. तसेच प्रेशर कुकरमधे उच्च तापमान आणि वाफेचा दाब जास्त असल्यानं भात शिजताना त्यातील हानिकारक जीवाणू नष्ट होतात. भात हा आरोग्यास घातक होऊ नये म्हणून शिजवताना त्यात मीठ घालू नये. कारण भात हा भाजी किंवा वरण आमटीसोबत खाल्ला जातो. भाजी आमटीत पुरेसं मीठ असल्यानं भाताद्वारे अतिरिक्त मीठ शरीरात जाण्यापासून वाचतं.

भात शिजवताना..

* भात शिजवताना त्यातील पाण्यात थोडं खोबर्‍याचं तेल घालावं. संशोधकाना नुकत्याच केलेल्या संशोधनात आढळून आलं आहे की भात शिजताना त्यात खोबर्‍याचं तेल घातल्यास भातातील प्रतिरोधक स्टार्चचं प्रमाण वाढतं आणि कॅलरीजचं प्रमाण कमी होतं.* प्रेशर कुकरमधे भात शिजवताना कुकरमधे दोन तीन लवंगा घालाव्यात. लवंगामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहाते. तसेच लवंगामधे असलेले अँण्टिऑक्सिडण्टस सूज दाह याविरुध्द लढतात. हे गुण प्रेशर कुकरमधे लवंगा टाकल्याने भातातही उतरतात.

छायाचित्र- गुगल

भात कसा खावा?

* भात आरोग्यदायी होण्यासठी तो कसा खातो हे देखील महत्त्वाचं. आरोग्यतज्ज्ञ म्हणतात की भातानं वजन वाढू नये म्हणून भातासोबत फायबर युक्त भाज्या खाव्यात. अशा पध्दतीनं भात खाल्ल्यास मनाला तृप्ती मिळते आणि तो आरोग्यदायीही ठरतो.* भात खातान त्यात थोडे जीरे घालून खावा. जिरे हे रक्तदाब तसेच रक्तातील साखर नियंत्रित ठेवतात. जिर्‍यामुळे भाताला विशिष्ट चवही येते.* भात आवडत असल्यास तो सोडून देण्यापेक्षा भात किती खातो याकडे लक्ष द्यायला हवं. थोडासा भात आणि त्यासोबत भरपूर भाजी आणि वरण/ आमटी खाल्ल्यास भात आरोग्यास फायदेशीर ठरतो आणि अशा पध्दतीनं भात खाल्ल्यास वजनही वाढत नाही.