Join us  

पोळ्या खूप उरल्या तर काय करणार? नेहमीचा कुस्करा नको; द्या नवा ट्विस्ट-कुरकुरीत गार्लिक बाइट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2022 2:42 PM

उरलेल्य पोळ्यांना जरा हटके ट्रीटमेण्ट देऊन त्याचं रुपांतर कुरकुरीत बाइटमध्ये करता येतं. गार्लिक ब्रेडच्या चवीच्या तोडीचा कुरकुरीत खाऊ उरलेल्या पोळ्यांपासून बनवता येतो,तोही फक्त दहा मिनिटात.. 

ठळक मुद्देउरलेल्या पोळ्यांना गार्लिक ब्रेडच्या चवीसारखी टेस्ट देता येते. ओव्हन किंवा नाॅनस्टिकवरही उरलेल्या पोळ्यांचा हा टेस्टी प्रकार तयार करता येतो.पोळ्यांचे हे कुरकुरीत, मसालेदार तुकडे मसाला दही/ साॅस सोबत छान लागतात किंवा तसेच नुसते चहासोबतही खाता येतात.

सकाळचा नाश्ता, दोन्ही वेळचं जेवण सोडून मधल्या काळात खूप भूक लागते. ही काही समस्या नाही. हे असं सर्वांच्याच बाबतीत होतं. पण यासाठी केवळ बिस्किटं, चिवडा, विकतच्या कडक चकल्या, चिप्स, कुरकुरे असे पदार्थ खाल्ले जातात. यामुळे भूक भागल्यासारखं वाटतं.. पण थोड्या वेळच. पुन्हा सडकून भूक लागते, पुन्हा शोधाशोध आणि मिळेल ते सटरफटर खाऊन आपण रात्रीच्या जेवणापर्यंतची कळ काढतो. पण मधल्या भुकेच्या वेळेस हेच पदार्थ जर नेहमी खात असू, घरातील लहान मुलांनाही मधल्या वेळेत खाऊ म्हणून हेच देत असू तर मग त्याचे आरोग्यावर आणि वजनावर वाईट परिणाम होतात. हे टाळून मधल्या भुकेसाठी पाच ते दहा मिनिटांच्या आत घरच्याघरी करता येतील असे बरेच पदार्थ आहेत. त्यातलाच हा एक पोळीपासूनचा कुरकुरीत खाऊ.

Image: Google

सकाळी केलेल्या पोळ्या रात्री उरुन राहातात, रात्री केलेल्या पोळ्या सकाळी उरतात.. अशा पोळ्यांचं काय करायचं हा प्रश्न  नेहमीच पडतो. गोड लाडू, तिखट कुस्करा किती वेळा करणर. कधी कधी तर उरलेल्या पोळ्यांचा तोच तोच प्रकार खाऊन आपल्याला आणि घरातल्यांनाही इतका कंटाळा आलेला असतो, की उरलेल्या पोळ्या वाया गेल्या तरी चालतील पण हे पदार्थ नको असं वाटायला लागतं. असा विचार करुन जर तुमच्यावर उरलेल्या पोळ्या वाया घालवण्याची वेळ येत असेल तर यावर एक टेस्टी आणि कुरकुरीत पर्याय आहे. हा पर्याय एकदा करुन बघितला तर पोळ्या उरलेल्याच बऱ्या असं वाटायला लागेल हे नक्की.

Image: Google

उरलेल्य पोळ्यांना जरा हटके ट्रीटमेण्ट देऊन त्याचं रुपांतर कुरकुरीत बाइट मधे करता येतं. गार्लिक ब्रेड ..  नाव काढताच पाणी सुटलं ना? पण पोळ्यांचा आणि गार्लिक ब्रेडचा काय संबंध? तर गार्लिक ब्रेडच्या चवीचा कुरकुरीत खाऊ उरलेल्या पोळ्यांपासून बनवता येतो. पोळ्या तर वाया जात नाहीच, शिवाय मधल्या भुकेसाठीचा चविष्ट आणि आरोग्याच्या दृष्टीकोनातून सुरक्षित पर्याय घरच्या घरी तयार करता येतो, तोही केवळ दहा मिनिटांच्या आत.उरलेल्या पोळ्यांचा कुरकुरीत गार्लिक बाइट तयार करणं अगदी सोपं आहे. घरात ओव्हन असला तर नसला तरी नाॅनस्टिक तव्यावर पोळीचा ह कुरकुरीत मसालेदार चटपटीत खाऊ झटपट होवू शकतो. 

Image: Google

कसा करायचा पोळ्यांचा गार्लिक बाइट

उरलेल्या पोळ्यांचा गार्लिक बाइट तयार करण्यासाठी 5-6 उरलेल्या पोळ्या, 3-4 लसणाच्या कळ्या, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि मिरे पूड, 2 मोठे चमचे बटर घ्यावं.पोळ्यांचा गार्लिक ब्रेड तयार करण्यासाठी  आधी एका वाटीत थोडं बटर घ्यावं. ते फेटावं किंवा थोडं गरम करुन वितळून घ्यावं.  मग यात बारीक कापलेला किंवा ओबड धोबड ठेचलेला लसूण, मीठ, लाल तिखट घालावं. सर्व बटरमध्ये मिसळून एकजीव करुन घ्यावं. एका वाटी चिली फ्लेक्स, काळे मिरे पूड, थोडा पिझ्झा मसाला, बारीक चिरलेला लसूण असा सुका मसाला तयार करुन ठेवावा.  उरलेल्या पोळ्या घ्याव्यात. त्या पोळपाटावर ठेवून् त्याचे छोटे त्रिकोणी तुकडे करावेत. सर्व पोळ्यांचे त्रिकोणी तुकडे करुन झालेत की मग ते बेकिंग ट्रेवर पसरुन ठेवावेत.

Image: Google

पोळीच्या त्रिकोणी तुकड्यांना बटरमध्ये तयार केलेलं मिश्रण पसरट चमच्यानं लावावं. मग यावर  थोडा हा कोरडा मसाला भुरभुरला की आणखी छान चव येते. यात आपण वरुन थोडं चिजही किसून घालू शकतो. मग हा ट्रे ओव्हनमधे ठेवावा. पोळ्यांचे तुकडे कुरकरीत होईपर्यंत ते बेक करावेत. ते कुरकुरीत झाले की ट्रे बाहेर काढावा. ते रुम टेम्परेचरला येवू द्यावेत आणि मग मस्त  मसाला दह्यात बुडवून किंवा नुसते तसेच चहासोबत  खावेत. हे कुरकुरीत पोळ्यांचे तुकडे डबाभर करुन ठेवले तरी एका दिवसात संपतील एवढे हे पोळ्यांचे कुरकरीत तुकडे टेस्टी लागतात.

Image: Google

नाॅनस्टिक तव्यावर पोळ्यांचे गार्लिक बाइट

दुसऱ्या पध्दतीने उरलेल्या पोळ्यांचा वापर करुन भरलेले पोळ्यांचे तुकडे करु शकतो. हा प्रकार नाॅनस्टिक तव्यावर करता येतो.  यासाठी किती पोळ्या आहेत हे बघून गार्लिक बटर, त्यासाठीचं साहित्य,  वरुन भुरभुरण्याच मसाला,  यात वापर करण्याच्या भाज्या  किती  घ्याव्यात हे ठरवावं. आधी गार्लिक बटर तयार करावं. गार्लिक बटर तयार करण्यासाठी एका मोठ्या वाटीत बटर  घ्यावं. ते चमच्यानं फेटावं. त्यात 7-8 लसण्याच्या पाकळ्या अगदी बारीक कापून किंवा ओबडधोबड ठेचून घालाव्यात. 1 बारीक चिरलेली हिरवी मिरची, 1 मोठ चमचा ओरेगानो मसाला किंवा पिझ्झा मसाला, 1 चमचा चिली फ्लेक्स किंवा लाल तिखट घालावं. हे सर्व नीट मिसळून एकजीव करावं. एका वाटीत थोडा ओरेगानो किंवा पिझ्झा मसाला, चिली फ्लेक्स हे एकत्र करुन वरुन भुरभुरण्यासाठीचा मसाला तयार करावा. यात मोझरेला चीज वापरायचं असल्यास ते बारीक चिरुन घ्यावं. कोथिंबीर, सिमला मिरची, कांदा बारीक चिरुन घ्यावा. मक्याचे ताजे दाणे उकडून घ्यावेत. 

Image: Google

आधी दोन पोळ्या घ्यावात. दोन पैकी एक पोळी पोळपाटावर ठेवावी. त्या पोळीला गार्लिक बटर नीट पसरुन लावावं. मग त्यावर थोडं नेहमी वापरतो ते चीझ किसून घालावं. बारीक चिरलेला कांदा, सिमला मिरची, उकडलेला मका पसरून घालावा. आपल्याला हवं असल्यस थोडे मोझरेला चीझचे तुकडे पेरावेत. कोथिंबीर पेरावी. एका वाटीत तयार केलेला सुका मिक्स मसाला वरुन भुरभुरावा. मग दुसऱ्या पोळीला गार्लिक बटर लावून घ्यावं. बटर लावलेली पोळी मसाला पेरलेल्या पोळीवर उलटी ठेवावी. या पोळीला वरुन गार्लिक बटर लावावं. नाॅन स्टिक तवा गरम करावा.

Image: Google

तव्यावर बटर  लावलेली बाजू खाली येईल अशा पध्दतीने तयार केलेली मसाला पोळी भाजायला ठेवावी. ही भरलेली पोळी  भाजायला ठेवल्यावर पोळीच्या वरच्या बाजूला गार्लिक बटर पसरुन लावावं. त्यावर थोडे  मोझरेला चीझचे तुकडे पेरावेत. थोडा मिक्स मसाला भुरभुरावा. पॅनवर झाकण ठेवावं. मंद आचेवर 10 मिनिटं  झाकण ठेवून ते भाजावी. मग झाकण काढावं. पोळीचा खालचा भाग सोनेरी आणि कडकसर झालेला असला की ही भाजलेली पोळी काढून घ्यावी. पिझ्झा कटरने कापून त्याचे तुकडे करावेत. पोळीचे  गरम मसालेदार तुकडे टमाटा साॅससोबत किंवा मसाला दह्यासोबत छान लागतात.उरलेल्या पोळ्यांचा हा मसालेदार पर्याय सकाळी नाश्त्यालाही छान लागतो. 

 

टॅग्स :अन्नकिचन टिप्स