आषाढ महिना सुरु झाला की मराठवाड्यात घरोघरी तळणाचे सुवास दरवळू लागतात. घरोघर एकमेकींना हमखास विचारला जाणारा एक प्रश्न म्हणजे.. "काय मग झाला का आषाढ तळून?". 'आषाढ' किंवा 'आखाड' अशा दोन्ही नावांनी हा महिना ओळखला जातो. पण या महिन्यात जो काही खास नैवेद्य केला जातो त्याला मात्र बोली भाषेत बहुतेक सर्वजणच सरसकट 'आषाढ तळणं' किंवा 'आखाड तळणं' असं म्हणतात. हा आषाढ नेमका तळला कसा जातो आणि तो तळायचा म्हणजे नेमकं काय करायचं, तेच बघू या.
महाराष्ट्राच्या प्रत्येक प्रांतात आषाढानिमित्त वेगवेगळा नैवेद्य दाखवला जातो. मराठवाड्याच्या खाद्य परंपरेनुसार आषाढ महिन्यात तिखटाच्या पुऱ्या, गोड पुऱ्या आणि दही- भात असा नैवेद्य केला जातो. घरच्या देवाला हा नैवेद्य दाखवतातच. पण घराजवळ जे कोणतं देवीचं मंदिर असेल, त्या मंदिरातही हा नैवेद्य वाढून नेला जातो. सुटी असल्याने घरातले सगळे रविवारी घरी असतात. शिवाय घरातल्या महिलांनाही रविवार थोडा निवांत असतो. त्यामुळे साधारण रविवारी बहुतांश घरात आषाढ तळला जातो. आणि त्यामुळे देवीच्या मंदिरात नैवेद्य घेऊन जाणाऱ्या महिलांचीही यादिवशी गर्दी दिसते.
मराठवाड्यातील आषाढ स्पेशल पारंपरिक पदार्थ१. तिखट पुऱ्या
ज्वारीचं पीठ आणि कणिक प्रत्येकी १ वाटी, बेसन अर्धी वाटी, ५ ते ६ हिरव्या मिरच्या, २ कप ताक किंवा एक कप दही, धने- जीरे पूड, थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि तळणासाठी तेल.कृती तिन्ही प्रकारची पीठं एका भांड्यात एकत्र करा. त्यात मिक्सरमधून बारीक केलेलं हिरव्या मिरच्यांचं तिखट, धने- जीरे पूड, चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घाला. हे सगळं मिश्रण ताक टाकून भिजवा. दही असेल तर त्याचं ताक करून घ्या. ताक चांगलं आंबट असावं. कारण आंबट असेल तरच पुऱ्यांना छान चव येईल. आता या पीठाच्या पुऱ्या लाटून तळून घ्या.
२. गोड पुऱ्या
२ वाट्या कणिक, १ वाटी गुळ, १ वाटी दूध, अर्धी वाटी पाणी, तळणासाठी तेल.कृतीसगळ्यात आधी तर गुळ पाण्यामध्ये एखादा तास भिजत घाला आणि त्याचं पाणी करून घ्या. आता या पाण्यात कणिक भिजवा. कणिक भिजवण्यासाठी हे पाणी कमी पडतं. त्यामुळे नंतर घालण्यासाठी त्यात पाण्याऐवजी दूध वापरा. गुळाचं पाणी आणि दूध टाकून कणिक भिजवली की ती अर्धा तास झाकून ठेवा. त्यानंतर त्याच्या पुऱ्या लाटून तळून घ्या. गोड तसेच तिखट पुऱ्या प्रवासासाठी अतिशय योग्य असून त्या २- ३ दिवस हमखास टिकतात.
३. दहीभातहा आणखी एक पदार्थ आषाढात मराठवाड्यात केला जातो. यासाठी आपला शिजवलेला पांढरा भात दही घालून कालवला जातो. त्यात मीठ- साखर घातली जाते. वरून तुप, मिरच्या, हिंग टाकून फोडणी घातली की झाला दहीभात तयार.
चार्तुमास स्पेशल रेसिपी, कांदा- लसूण न टाकता करा टोमॅटोची झणकेदार भाजी, चव अशी की आहाहा...
नैवेद्य वाढण्याची पद्धत- आषाढातला हा नैवेद्य जसा इतर सणासुदीला केलेल्या नैवेद्यापेक्षा वेगळा असतो, तशीच तो नैवेद्य वाढण्याची पद्धतही खूप वेगळी असते.- हा नैवेद्य वाढण्यासाठी एका ताटात ७ तिखट पुऱ्या गोलाकार ठेवतात. त्यावर ७ गोड पुऱ्या ठेवल्या जातात आणि प्रत्येक पुरीवर दहीभात वाढतात. मधोमध एक तुळशीचं पान ठेवून देवाला हा नैवेद्य अर्पण करतात.