- अंजली भाईक
साधारणपणे जुलै महिना येतो तेच मुळी स्थिरावलेला पाऊस घेऊन. कधी रिमझिम तरी कधी धो धो बरसणाऱ्या आषाढात वैदर्भिय त्यातही ग्रामीण भागात सणवार अन परंपरेशी जोडलेले खाद्यपदार्थही त्यामागोमाग येतात. पर्जन्यराजा बऱ्यापैकी स्थिरावलेले, पेरण्या, भातलावण्या होत आलेल्या. अशावेळी ग्रामीण भागातील वैष्णवांना हाक देत असते विठुमाऊली अन पंढरीची आस असलेला वारकरी निघतो वारीला थोडीफार शिधा सामुग्री घेऊन .
कोणी घेतं दोन तीन दिवस पुरणाऱ्या दशम्या, कोणी गावरान गुळ वापरून केलेले शेंगदाणे फुटाणे,मुरमुरे लाडु . कोणी सातुचे पीठ अन गुळ. कोणी कोरड्या चटण्या (शेंगदाणे, तीळ किंवा जवस) मुख्यत्वेकरून जे जास्त पिकतं त्यातुन खाद्यपरंपरा जपणारा वैदर्भिय ..
Image: Google
वाघाट्याची भाजी
आषाढी एकादशीच्या उपासानंतर येणाऱ्या द्वादशीला म्हणजेच बारशीला (बारस) उपास सोडायला कसेही करून वाघाट्याची (वेलवर्गीय टणक रानफळ) भाजी होणारच.
साधारणतः आवळ्यापेक्षा थोडे मोठे अन कडसर असतात वाघाटे. चारपाच वाघाटे स्वच्छ धुवुन फोडायचे व थोडे मीठ घालुन उकडून घ्यावे.
आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवावे, नेहमीप्रमाणे जीरे मोहरीची फोडणी करून हिंग, कढीपत्ता सुकलेल्या लाल मिरच्यांचे तुकडे किंवा हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालून, हळद घातल्यावर अर्धी वाटी भिजवलेली चणाडाळ व वाघाट्याच्या उकडलेल्या फोडी घालून वाफेवर निवांत मंद गॅस वर शिजु द्यावे. शिजतांनाच मीठ सुद्धा घालावे . या भाजीच्या सेवनाशिवाय एकादशीचा उपास सफल होत नाही असे म्हणतात. काही ठिकाणी या भाजीला आले लसुण कांदासुद्धा वापरतात.
Image: Google
गुळशेलं
द्वादशीला गोडाचा नैवेद्य म्हणुन कोहळ्याचं गुळशेलं किंवा गोड बोंडं /गुलगुले केले जातात. पाव किलो कोहळ्याची पाठ सोलून छोट्या फोडी करून वाफवुन घ्यायच्या किंंवा कोहळं किसुन घ्यावे. एकीकडे एक लिटर दुध थोडे आटवायला ठेवावे. आता दोन/तीन चमचे तुपावर या वाफवलेल्या फोडी /किस चमचाभर खसखस आणि तीन चार चमचे खोबरे किसासोबत छान परतवुन घ्याव्यात. परततांना फोडी एकजीव होतात जायफळ /वेलची पुड घालुन आटवलेले दुधव आवडीनुसार साखर घालून थोडा वेळ एकत्र उकळू द्यावे. थोड्यावेळाने गॅस बंद करावा. या पदार्थाला खुप सुरेख रंग येतो.
Image: Google
बोंडे/गुलगुले
पाव किलो कोहळ्याच्या पाठ सोललेल्या वाफवेल्या फोडींमध्ये तेवढीच गुळ पावडर /साखर , थोडेसे चिमुटभर मीठ, थोडे तेल घालून छान एकत्र करून घ्यावे. आवडीनुसार चमचाभर खसखस, सुक्या मेव्याचे काप, घालुन अर्धी वाटी रवा , थोडी थोडी कणिक घालत फेटत रहावे. साधारण भजींसारखे पीठ झाल्यावर कणिक घालणं थांबवून चांगले फेटून घ्यावे. गरम तेल किंवा तुपावर बोंडं/ गुलगुले खरपुस तळुन घ्यावेत .
Image: Google
वास्ते
आषाढाच्या याच रिमझिम काळात जेव्हा आपल्याला कांदाभजी खावीशी वाटतात तेव्हा ग्रामीण विभागातला माणूस बांबुचे कोवळे कोंब शोधत असतो, या कोवळ्या कोंबांना "वास्ते " म्हणतात. या वास्त्यांचे वडे म्हणजे निव्वळ स्वर्गसुख.
दहा ते बारा ईंचांचे बांबूच्या तीन कोंबांचे वरचे आवरण काढून आतल्या कोवळ्या भागाचा जाड किस करावा. हा किस स्वच्छ धुवुन वाफवून घ्यावा. त्यानंतर काहीजण हा किस पिळूनही घेतात. किसामध्ये दीडवाटी भिजवलेल्या चणाडाळीचे वाटलेले मिश्रण, आवश्यकतेनुसार मिरची, आलं लसणाचं वाटण, धणे पूड ,हळद ,मीठ घालुन एकत्र केलेल्या मिश्रणाचे वडे तळून घ्यावेत. अफलातुन चवीचे अनोखे वडे एकदातरी खावेतच. कोवळा बांबू तब्येतीसाठी उत्तम असून त्यामध्ये फायबरसुद्धा मिळते. या कोवळ्या बांबुची भाजीसुद्धा करतात.
Image: Google
तांदुळमेथीदाण्यांचे बोंडं
सर्वप्रथम अर्धी वाटी तांदुळ व अर्धीवाटी मेथीदाणे एकत्र करून जरा जास्त पाणी घालून शिजवुन घ्यावे. थोडं थंड झाल्यावर वाटुन घ्यावे. वाटलेले मिश्रण परातीत घेऊन त्यामध्ये चमचाभर तीळ, ओवा, अर्धी वाटी आंबट दही, आलं लसुण पेस्ट, चिरलेली कोथिंबीर, कढिपत्त्याची पानं, मीठ, थोडीशीच साखर घालून छान मिसळुन घ्यावे व थोडी थोडी कणिक घालत फेटत रहावे, जितके जास्त फेटाल तितकी हलकी बोंडं हा सरळ हिशोब. भज्यांप्रमाणेच पीठ व्हायला हवे व हळुवारपणे हातानेच गरम तेलात बोंडं सोडावीत . जबरदस्त चवीची बोंडं किती खाल्ली याचा हिशोबच करू नये.
Image: Google
काकडीचे धापोडे
या दिवसात मोठ्या काकड्या भरपूर मिळतात .एक मोठी काकडी सोलून किस करावा, परातीत किस घेऊन ओवा, तीळ, हळद, तिखट किंवा हिरवी मिरची पेस्ट, मीठ कढिपत्ता, चिरलेली कोथींबीर, सर्व प्रमाणात घेऊन त्यामध्ये बसेल तेवढी कणिक किंवा मिश्र धान्यांचे पीठ घेऊन सैलसर भिजवून घ्यावे. हाताला पाणी लावुन वड्यापेक्षा जरा पातळ थापुन गरम तेलावर खमंग तळावेत. या धापोड्यांसोबत झणझणीत मिरचीचा ठेचा अन ताक असलं की आपलं पोटच भरतं.
Image: Google
रताळ्याचे किंवा मोहाचे पुरण
पुरणासाठी शिजवलेल्या चणाडाळीसोबतच सोललेली ऊकडलेली रताळी कुसकरून घालावी. मिश्रणाच्या दिडपटीने गुळ किंवा साखर घालून रटरट शिजवावे. भांड्याच्या कडा सुटेपर्यंत मिश्रण झाले की गॅस बंद करावा व पुरण वाटून घ्यावे. अशाच प्रकारे मोहाची फुले स्वच्छ धुवुन साफ करून पण साखर गुळाचे प्रमाण जरा कमी घ्यावे कारण मोहफुले गोड असतात . मोहफुलांचे पुरणसुद्धा झकास होते. मोहफुले म्हणजे आरोग्यवर्धक औषधांचा खजिनाच आहे. ते जमलं नाही तरी रताळ्याचं पुरण अवश्य करुन पहा.
तळटिप - तेवढेच घ्या ताटात, जेवढे जाते पोटात .
(लेखिका वरिष्ठ अधीक्षक म्हणून सेवानिवृत्त झालेल्या असून विस्मृतित गेलेले तसेच नवनवीन पदार्थ तयार करून त्यावर लेखन करायला त्यांना आवडतं. #अंजानागपूरी या हॅशटॅगने फेसबुक रेसिपी त्या लिहितात.)