Join us  

आषाढ स्पेशल पारंपरिक रेसिपी : तिखट मिठाच्या पुऱ्या खुसखुशीत होण्यासाठी करा फक्त २ गोष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2023 1:43 PM

Ashadh Special Tikhat Mith Puri Recipe : चहाच्या वेळेला खायला किंवा बाहेर जाताना सोबत नेण्यासाठी हा उत्तम पर्याय असतो.

आषाढ महिना आला की आपल्याला बाहेर फिरायला जाण्याचे, सणावारांचे आणि खाण्यापिण्याच्या गोष्टींचे बेत रंगतात. आषाढ महिन्यात आवर्जून केला जाणारा बेत म्हणजे गोडाच्या आणि तिखटमिठाच्या पुऱ्या. अनेकांकडे या पुऱ्यांचा देवाला नैवेद्य दाखवण्याचीही पद्धत आहे. पावसाळ्यात असं गरमागरम आणि चमचमीत खायलाही छान लागतं. आपण बरेचदा तिखट मिठाच्या पुऱ्या करतो. पण त्या छान टम्म फुगणाऱ्या आणि मऊ होतात. त्याऐवजी एकदम कडक आणि कुडकुडीत अशा तिखटमिठाच्या पुऱ्या करायच्या असतील तर त्या कशा करायच्या यासाठी काही खास टिप्स आज आपण पाहणार आहोत. या पुऱ्या इतक्या छान लागतात की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे त्या खूप आवडीने खातात. चहाच्या वेळेला खायला किंवा बाहेर जाताना सोबत नेण्यासाठी हा उत्तम पर्याय असतो. या पुऱ्या कशा करायच्या पाहूयात (Ashadh Special Tikhat Mith Puri Recipe)...

साहित्य -

१. गव्हाचे पीठ - ३ वाट्या 

२. बेसन - १ वाटी 

३. मोहनासाठी तेल - अर्धी वाटी 

४. ओवा - १ चमचा 

(Image : Google)

५. तीळ - १ चमचा 

६. तिखट - १ चमचा 

७. मीठ - चवीनुसार 

८. हळद - अर्धा चमचा 

९. धणे-जीरे पूड - अर्धा चमचा 

१०. तेल - तळण्यासाठी साधारण २ वाट्या 

११. पिठीसाखर - अर्धा ते पाऊण चमचा  

कृती -

१. गव्हाचे पीठ, बेसन, तिखट, हळद, धणेजीरे पावडर, तीळ, ओवा, मीठ, पिठीसाखर हे सगळे एकत्र करुन घ्यायचे. 

२. यामध्ये अर्धी वाटी तेल गरम करावे आणि हे मोहन या पीठात घालावे. कोमट पाणी घेऊन घट्टसर पीठ मळून घ्यायचे. 

३. आवडीनुसार यामध्ये कसुरी मेथी किंवा कोथिंबीरही घालू शकतो. 

४. साधारण १५ ते २० मिनीटांसाठी हा भिजवलेल्या पिठाचा गोळा झाकून ठेवावा.

५. नंतर त्याच्या एकसारख्या पातळ पुऱ्या लाटून घ्याव्यात. मोठी पोळी लाटून वाटीने पुऱ्या पाडल्या तरी चालतात. 

६. कढईत तेल घालून ते गॅसवर तापण्यासाठी ठेवावे आणि मंद आचेवर पुऱ्या तळाव्यात.

७. तळताना पुरी सतत झाऱ्याने दाबत राहिल्यास ती कडक होण्यास मदत होते. 

टिप - पुऱ्या पातळ लाटणे आणि बारीक गॅसवर दाबत दाबत तळणे याला वेळ लागत असला तरी त्यामुळे पुऱ्या कुडकुडीत चविष्ट होण्यास मदत होते.  

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.