Join us  

उपवासाला खिचडी- वडे नेहमीचेच; ट्राय करा पीठ न भिजवता झटपट इडली-चटणी, घ्या सोपी रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2023 2:38 PM

Ashadhi Ekadashi Special Easy Upwas Idli Recipe : पीठ भिजवण्याचीही गरज नाही तर अगदी काही वेळात झटपट तयार होणारी ही इडली कशी करायची ते पाहूया

आषाढी एकादशीला राज्यभरात अतिशय भक्तीभावाने उपवास केला जातो. उपवास म्हटले की साबुदाण्याची खिचडी, वडे, थालीपीठ किंवा भगर असे नेहमीचे पदार्थ आपण करतो. पण उपवासाला नेहमी तेच ते खाऊन आणि करुनही आपल्याला काही वेळा  कंटाळा येतो. अशावेळी नेहमीपेक्षा वेगळा, पोटभरीचा आणि पौष्टीक असा पदार्थ केला तर? इडली हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ. ताटात गरमागरम इडली असेल की अनेकदा आपल्याला त्याच्या सोबत काहीही नसले तरी चालते. मऊ-लुसलुशीत इडल्यांवर ताव मारुन आपले पोटही छान भरते. उपवासाच्या दिवशीही आपल्याला अशीच इडली आणि चटणी खाता आली तर काय मज्जा येईल ना? त्यातही याला नेहमीच्या इडलीप्रमाणे पीठ भिजवण्याचीही गरज नाही तर अगदी काही वेळात झटपट तयार होणारी ही इडली कशी करायची ते पाहूया (Ashadhi Ekadashi Special Easy Upwas Idli Recipe)...

१. मिक्सरच्या भांड्यात १ वाटी वरई म्हणजेच भगर आणि पाव वाटी साबुदाणा घालून ते थोडे रवाळ असे मिक्सरमध्ये वाटून घ्या. 

(Image : Google)

२. यामध्ये १ मोठ्या बटाट्याच्या सालं काढून फोडी आणि पाव वाटी दही घाला.

३. त्यात आवडीनुसार मिरची, आलं घालून हे मिश्रण अंदाजे पाणी घालून मिक्सरमधून चांगले वाटून घ्या. 

४. हे घट्टसर पीठ तयार झाले की ते एका बाऊलमध्ये काढून घेऊन त्यामध्ये चवीनुसार मीठ घाला आणि भरपूर हलवून हे पीठ मुरण्यासाठी अर्धा ते पाऊण तास ठेवून द्या. 

५. यामध्ये पाव चमचा सोडा घालून त्यावर थोडेसे पाणी घालून पीठ पुन्हा चांगले हलवून घ्या. सोडा घालायचा नसेल तर हे पीठ किमान १० तास भिजत ठेवावे म्हणजे चांगले आंबते.

६. त्यानंतर इडली पात्राला आपण नेहमी तेल लावून इडल्या लावतो तशा इडल्या लावा अतिशय मऊ आणि लुसलुशीत अशा पांढऱ्याशुभ्र इडल्या तयार होतात. 

चटणीसाठी 

खोबऱ्याची चटणी आवडत असेल तर अर्धी वाटी ओलं खोबरं नाहीतर अर्धी वाटी भाजलेले दाणे, त्यात मिरची, जीरं, मीठ, साखर, दही किंवा लिंबाचा रस घालून मिक्सरमधून बारीक फिरवून घ्या. आवडीनुसार तुम्ही याला जिऱ्याची फोडणी देऊ शकता. उपवासाला कोथिंबीर घालत असाल तर कोथिंबीर वापरा नाहीतर सुक्या लाल मिरच्या वापरुन लाल रंगाची चटणीही चांगली होते. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.आषाढी एकादशी