कस्तुरी खेडकर
आषाढी एकादशीला काय स्पेशल करायचं असा प्रश्न पडतोच. साबुदाणा खिचडी, बटाटा किस,थालिपीठ, वडे तर नेहमीच करतो. आषाढीला काहीतरी खास हवं असं वाटतंच. त्यात व्हॉट्सॲपवर पदार्थांची ही भलीमोठी यादी येते की, एकादशी आणि दुप्पट खाशी असा मामला होतोच. मग नंतर पोट कुरकुर करायला लागतं. अर्थात म्हणून काही खाणं थांबत नाही, बाहेर मस्त पाऊस पडत असताना काहीतरी छान खावं-खिलवावं असं वाटतंच.त्यातही उपवासाचे पदार्थही जरा वेगळे करुन पाहण्याचा मोह होतोच. उपवासाचे डोसे-इडली-आप्पे करणंही तसं आता रुळलंच.आणि ते करायचं तर दुपारच्या फराळासाठी. उपवास असला तरी नाश्ता हवाच..मग म्हणून हा उपवास स्पेशल खास ‘उपवासाचा ढोकळा’ करुन पहा.करायला सोपा, साहित्य फार कमी आणि कमी वेळेत हा पदार्थ होतो.थोडक्यात साधा-सोपा, लवकर होणारा, पचायला हलका असा छान उपवास ढोकळा.. नेहमी ढोकळा करतो तीच कृती, फक्त साहित्य उपवासाचं.
(छायाचित्र- कस्तुरी खेडकर)
साहित्य
साबुदाणा पीठ, भगर(वरई)पीठ, राजगीरा पीठ,यापैकी तुमच्याकडे जे उपलब्ध असेल ते पीठ. भगर किंवा राजगीरा पीठ घेतलं तर जास्त छान. कारण पौष्टिक आणि पचायला हलका होतो ढोकळा. नसेलच तर साबुदाणा पीठही चालेल.आले,मिरची,तुप,जीरे,दही,पाणी, इनो. किंवा खायचा सोडा.
कृती
दोन वाट्या पीठ. त्यात चार - पाच चमचे दही टाकायचे आणि थोडं पाणी घालून , सारखे करुन पंधरा वीस मिनिटे भिजवून ठेवणे.मग त्यात आले, जिरे, मिरची वाटण घालायचं. पाणी घालून सरबरीत भिजवून घ्यायचं. चांगले फेटून घ्यायचे. मग एक चमचा इनो किंवा खायचा सोडा घालून मिक्स करायचे. ( काहीजणांकडे उपवासाला इनो किंवा खायचा सोडा चालत नाही, त्याविषयी प्रश्न असतात. त्याविषयीचा निर्णय आपला आपण करावा. अनेक घरात खायचा सोडा चालतो.) डब्यात घालून वीस मिनिटे वाफ आणायची नेहमी ढोकळ्याला आणतो तशी. मग तुप जीरे मिरची घालून फोडणी घालायची. वरतून ओले खोबरे भूरभूरले की उपवास ढोकळा तयार.उपवास म्हणून पचायला हलके खाणेही होते आणि चवबदलही. नाश्त्याला कमी वेळात हा पदार्थ करता येतो.
(लेखिका के.के. फूड्स उद्योगाच्या संचालक आहेत.)