नाश्त्याला किंवा कोणी पाहुणे आल्यावर झटपट करता येईल असा पदार्थ म्हणजे कांदेपोहे. अगदी १० मिनीटांत होणारे हे पोहे अनेकांच्या आवडीचा पदार्थ असतो. पटकन होत असल्याने आणि गरमागरम छान लागत असल्याने बहुतांश जणांकडे नाश्त्याला आवर्जून पोहे किंवा उपमा केला जातो. पण नेहमी नेहमी आपल्याला असे पोहे खाऊन कंटाळा येऊ शकतो. अशावेळी कधी आपण दडपे पोहे तर कधी दही पोहे असे काहीतरी वेगळे करायचा प्रयत्न करतो. आज आपण पोह्यांपासून होणारा असाच एक अतिशय चविष्ट आणि पारंपरिक पदार्थ पाहणार आहोत. कोळातले पोहे असे या पदार्थाचे नाव असून नारळाचे दूध, पोह्याचे मिरगुंड असे कोकणी पदार्थ वापरुन हे पोहे केले जातात. अतिशय चविष्ट आणि तरीही पोटभरीचे असे हे पोहे तुम्ही एकदा खाल्ले तर तुम्ही या पदार्थाचे नक्कीच फॅन व्हाल. कोळ काढायचा म्हणजे काहीतरी वेळखाऊ किंवा अवघड प्रकरण असणार असं तुम्हाला नावावरुन वाटू शकेल. पण अगदी झटपट होत असल्याने हे पोहे सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यावर आपण लहान मुलांनाही देऊ शकतो. पाहूया हे पोहे करण्याची सोपी रेसिपी (Authentic Kolatle pohe Recipe)...
साहित्य -
१. पातळ पोहे - २ वाट्या
२. पोह्याचे पापड किंवा मिरगुंड - २
३. नारळ - २
४. गुळ - अर्धी वाटी
५. चिंच - ४ ते ५ बुटुक
६. लाल मिरची - ४ ते ५
७. हिरव्या मिरचीचा ठेचा - आवडीनुसार
८. बारीक चिरलेली कोथींबीर - २ चमचे
९. मीठ - चवीनुसार
१०. फोडणीसाठी तूप - २ चमचे
११. जीरं - अर्धा चमचा
कृती -
१. नारळ फोडून वाटून घ्या. त्यात पाणी घालून पिळून नारळाचे दूध काढा.
२. चिंचं भिजत घालून कोळ काढून घ्या आणि त्यात गूळ आणि मीठ घाला.
३. नारळाच्या दुधात चिंचेचा कोळ, मिरचीची पेस्ट, घालून ते एकजीव करून घ्या.
४. या दुधावर जीरे, लाल मिरचीची फोडणी घालून कोळ तयार करा.
५. पोह्याचे पापड तळून ते बारीक कुस्करून घ्या.
६. एका बाऊलमध्ये पातळ पोहे, कुस्करलेले पापड घेऊन वरून तयार केलेला कोळ घाला आणि कोथिंबीर घालून पोह्यांचा आस्वाद घ्या.