श्रावण महिना म्हणजे सणवार आणि गोडाधोडाचे पदार्थ यांची चांगलीच चंगळ असते. श्रावणी सोमवार, शुक्रवार, मंगळागौर, सत्यनारायण पूजा, नागपंचमी, नारळी पौर्णिमा आणि त्यापाठोपाठ येणारे गौरी-गणपती. सणवार म्हटल्यावर साग्रसंगीत स्वयंपाक आणि त्यात आवर्जून केले जाणारे गोडाचे पदार्थ. पुरणा-वरणाचा स्वयंपाक एकदा केला तरी दर सोमवारी किंवा शुक्रवारी काही आपण पुरण करत नाही. अशावेळी घरच्या घरी झटपट होईल असे सोपे आणि तरीही पारंपरिक पदार्थ केले जातात. यामध्ये शेवयाची खीर, दलिया, शिरा यांसारख्या घरगुती तरीही तितक्याच चविष्ट पदार्थांचा समावेश असतो (Authentic Konkani Sweet Pangi Shravan Special).
महाराष्ट्रात मैलागणिक स्वयंपाक करण्याची पद्धत बदलते त्याचप्रमाणे गोडाचे पदार्थही बदलतात. आपण ज्याप्रमाणे गव्हाची खीर करतो तशी कोकणात तांदळाची खीर केली जाते. उकडीचे मोदक, हळदीच्या किंवा केळीच्या पानावरच्या पानगी हे कोकणातील खास मिष्टान्न. कोकण किनारपट्टीला तांदूळ, नारळ मोठ्या प्रमाणात पिकत असल्याने या भागात हे पदार्थ आवर्जून केले जातात. श्रावणात केळीची पाने, खुंट अगदी सहज मिळत असल्याने आपणही पानगीसारखा गोड पदार्थ नक्कीच ट्राय करु शकतो. कमीत कमी कष्टात आणि झटपट होणारा हा पदार्थ कसा करायचा पाहूया...
१. तांदळाच्या पीठात मीठ घालून ते चमच्याने पडेल इतके पाणी घालून भिजवायचे.
२. दुसरीकडे नारळाचा चव काढून घ्यायचा आणि त्यात आवडीप्रमाणे साखर किंवा गूळ आणि वेलची पूड घालायची.
३. केळीच्या पानांचे लहान तुकडे करुन ते स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे.
४. गॅसवर तवा ठेवून त्यावर ही केळीची पाने ठेवायची आणि हे पीठ घालून हे पान बंद करायचे.
५. दोन्ही बाजुने चांगले शिजले की ही पाने खाली काढायची आणि यातील तांदळाच्या शिजलेल्या पातळ पानग्या एका ताटात काढायच्या.
६. या गरमागरम पानगीवर कणीदार भरपूर तूप घालून त्यावर नारळ आणि गूळाचे एकत्र केलेले सारण घालायचे.
७. शक्य असेल तर यावर नारळाचे दूधही घातल्यास अतिशय छान लागते.
८. केळीच्या किंवा हळदीच्या पानाचा स्वाद लागल्याने या पानग्या अतिशय सुंदर लागतात.
९. जेवणातील मिष्टान्न म्हणून किंवा नाश्त्यालाही आपण या गरमागरम पानग्या करु शकतो. तेव्हा यंदा श्रावणात हा आगळावेगळा कोकणी पदार्थ नक्की ट्राय करा.