Join us  

थंडीच्या दिवसांत करा झणझणीत गावरान मासवडी- भाकरीचा बेत, पारंपरिक पदार्थ एकदा चाखाल तर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2023 4:29 PM

Authentic Maharashtrian Mas wadi Recipe : पिठलं किंवा कोणत्याही भाजी-उसळीचा झणझणीत रस्सा याला पर्याय असलेली पारंपरिक रेसिपी...

थंडीच्या दिवसांत आपल्याला सतत चमचमीत, गरमागरम काहीतरी खावसं वाटतं. विशेष म्हणजे या दिवसांत आपण थोडं तिखट, मसालेदार असं काही खाल्लं तरी ते चांगलं पचत असल्याने या काळात जास्त पथ्यपाणी पाळण्याची आवश्यकता नसते. थंडीत शरीराला ऊर्जेची जास्त प्रमाणात आवश्यकता असल्याने खाल्लेले अन्न चांगले पचतेही त्यामुळे आपण थोडा जड, तेलकट, मसालेदार असा आहार या काळात आवर्जून घेऊ शकतो. ज्या महिलांना रोज वेगळी काय भाजी करायची किंवा विकेंडला काय मेन्यू करायचा असा प्रश्न पडला असेल त्यांच्यासाठी गावरान पद्धतीची थोडी झणझणीत पण अतिशय चविष्ट अशी मासवडीची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टींपासून तयार होणारी ही मासवडी अतिशय चविष्ट लागत असल्याने घरी कोणी पाहुणे येणार असतील तरी आपण हा बेत आवर्जून करु शकतो. पिठलं किंवा कोणत्याही भाजी-उसळीचा झणझणीत रस्सा याला पर्याय असलेली ही पारंपरिक-गावरान रेसिपी नेमकी कशी करायची पाहूया (Authentic Maharashtrian Maswadi Recipe)    ...

साहित्य - 

१. तीळ – १ वाटी 

२. शेंगादाणे - १ वाटी 

३. कांदा - १ 

४. धणे - २ चमचे 

५. सुकं खोबरं - १ वाटी 

६. मिरची, जीरं लसूण वाटण – २ चमचे 

(Image : Google)

७. हळद – अर्धा चमचा 

८. बेसन पीठ – १ ते १.५ वाटी 

९. कोथिंबीर – १ वाटी बारीक चिरलेली

कृती - 

१. एका कढईत तीळ खरपूस भाजून घ्यायचे. 

२. त्याच कढईत दाणे आणि नंतर खोबरेही चांगले भाजून घ्यायचे. 

३. थोडं तेल घालून यामध्ये बारीक चिरलेला १ कांदा आणि धणे घालून ते चांगले परतून घ्यायचे. 

४. खलबत्ता किंवा मिक्सरमध्ये मिरची, लसूण आणि जीरं बारीक करुन घ्यायचं. 

५. कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये हे वाटण आणि हळद घालून त्यात पाणी घालायचं.

६. या पाण्याला उकळी आली की हळूहळू बेसन पीठ घालून हे मिश्रण चांगले एकजीव होईपर्यंत हलवत राहायचे. 

 

७. पाटा, वरवंट्यामध्ये दाणे, तीळ, कांदा आणि धणे, सुकं खोबरं, कोथिंबीर, मीठ, तिखट, हळद एकत्र करुन चांगले बारीक आणि एकजीव होईपर्यंत वाटून घ्यायचे. 

८. एका ओल्या कापडावर खोबरं, कोथिंबीर पसरायची, त्यावर उकड घेतलेलं बेसनाचं पीठ पसरायचं आणि त्यामध्ये हे वाटण भरुन त्याचा रोल करुन घ्यायचा. 

९. थोडं गार झालं की याच्या एकसारख्या वड्या पाडायच्या आणि त्या रस्स्यामध्ये घालून भाकरी किंवा भातासोबत खायच्या.

रस्सा करण्यासाठी...

कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, खोबरं यांचं वाटण करुन तेलामध्ये ते चांगले परतायचे. त्यामध्ये कांदा-लसूण मसाला, धणे-जीरे पावडर, तिखट, गोडा मसाला, हळद, मीठ घालून पाणी घालायचे आणि चांगली उकळी येऊ द्यायची. वरुन हिरवीगार कोथिंबीर घातली की मासवडीचा गरमागरम रस्सा तयार.   

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.