मसालेभात हा महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थ. लग्नाच्या पंगतीत असणाऱ्या या मसालेभातावर आपण चांगलाच ताव मारतो. पण असा भात घरी करायचा म्हटला की तो तितका मोकळा आणि परफेक्ट होतोच असे नाही. पण मग हा पंगतीतला भात तर आपल्यााल खूप आवडलेला असतो आणि घरी ट्रायही करायचा असतो. संध्याकाळच्या जेवणाला किंवा विकेंडला असा भात, एखादी कोशिंबीर आणि पापड असा बेत केला तरी जेवण मस्त होऊ शकते. हिवाळ्याच्या दिवसांत तर आपल्याला गरमागरम काहीतरी खावंसं वाटत असतं, तसंच बाजारात भाज्याही भरपूर उपलब्ध असतात. अशावेळी हा चविष्ट असा मसालेभात जेवणाची रंगत वाढवतो. पाहूयात हा भात परफेक्ट मोकळा आणि लग्नाच्या पंगतीसारखा होण्यासाठी नेमकं काय करायचं (Authentic Maharashtrian Masalebhat Recipe) .
साहित्य -
१. तांदूळ - २ वाट्या (भात मोकळा होईल असा कोणताही बासमती, कोलम इ.)
२. खडा मसाला - अंदाजे
३. गोडा मसाला - १ चमचा
४. तिखट - अर्धा चमचा
५. हळद - अर्धा चमचा
६. तेल - २ चमचे
७. मोहरी, जीरं - अर्धा चमचा
८. कांदा - २ लहान
९. टोमॅटो - २ लहान
१०. बटाटा - १
११. मटार - अर्धी ते पाऊण वाटी
१२. तूप - २ चमचे
१३. आलं-लसूण पेस्ट - १ चमचा
१४. मीठ - चवीनुसार
कृती -
१. कढईत तेल घालून त्यात मोहरी, जीरं आणि दालचिनी, तमालपत्र, लवंग, काळी मिरी, वेलची असे उपलब्ध असतील ते खडे मसाले घालायचे.
२. यामध्ये आलं-लसूण पेस्ट उभा चिरलेला कांदा, चौकोनी चिरलेला टोमॅटो आणि बटाटा, मटार घालून सगळे चांगले परतून घ्यायचे.
३. नंतर यामध्ये हळद, तिखट, गोडा मसाला घालून सगळे चांगले परतून घ्यायचे.
४. यामध्ये धुतलेले तांदूळ घालून तांदूळाच्या दुप्पट पाणी घालायचे. म्हणजे आपण २ वाटी तांदूळ घेतले तर त्याच वाटीने मोजून ४ वाटी पाणी घालायचे.
५. यामध्ये चवीनुसार मीठ घालून चांगली उकळी येईपर्यंत गॅस मोठा ठेवायचा.
६. नंतर गॅस बारीक करुन कढईवर झाकण ठेवायचे आणि १५ ते २० मिनीटे भात चांगला शिजू द्यायचा.
७. भात शिजत आला असे वाटले की कढईत कडेने तूप सोडायचे आणि भात एकदा हलवून पाहायचा. तुपामुळे भात जास्त मोकळा होण्यास मदत होते.
८. गरमागरम मसालेभात ताटलीत घेऊन त्यावर खोबरं-कोथिंबीर आणि आवडत असेल तर पुन्हा वरुन तूप घालायचे आणि भाताचा आस्वाद घ्यायचा.