Join us  

अस्सल पारंपरिक मराठी चवीचा मसालेभात करायचाय? ही घ्या सोपी रेसिपी, घमघमाटानेच भूक खवळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2024 8:00 AM

पुलाव आणि फ्राइड राइस म्हणजे मसालेभात नव्हे

ठळक मुद्दे सगळ्यात महत्वाचा मुद्दा मसालेभात मोकळा असतो पण मऊ असतो. फडफडीत नाही.

आजकाल लग्नात कुठंही जा पुलाव मिळतो नाहीतर फ्राइड राइस. पण पारंपरिक मराठी पद्धतीचा मसालेभात मिळणं मु्श्किल. मसालेभात, मठ्ठा, जिलबी हे पारंपरिक जेवण तर कालबाह्यच झाल्यात जमा आहे असं वाटतं. पण आजही मसालेभात म्हंटलं की विशिष्ट सुगंध दरवळतो, तोंडाला पाणी सुटते. मसालेभात, त्यावर मस्त ओलं खोबरं, कोथिंबीर आणि सोबत कढी आणि जिलबी असेल तर तृप्त होतो जीव. मसालेभाताला विशिष्ट चव आणि रंग असतेच.  भरपूर भाज्या घातल्या, मसाले ओतले की झाला मसालेभात असं होत नाही. मसाले भाताची म्हणून एक अस्सल चव आणि रंग असते ती जमले पाहिजे.

मसाले भातात भाज्या घातल्या जातात म्हणून तो काही पुलाव होत नाही. पण मसाले भातातलं पाण्याचं प्रमाण चुकलं तर मात्र मसाले भाताची खिचडी होण्याचा धोका असतोच. आणि गचका होतो. त्यात काही मज्जा नाही.

(Image : google)

मसालेभात करताना..१. मसालेभात करायचा तर मध्यम लांबीचा म्हणजे कोलम किंवा चिनोर सारखा तांदूळ घ्या.२. तोंडली, फ्लॉवर, वांगी, फरसबी, मटार, वांगी गाजर एवढ्याच भाज्या घ्या. भरमसाठ कांदे बटाटे नको. मसालेभातात कांदा घालू नये.३. मसालेभात करताना घड्याळीकडे बारकाईनं लक्ष हवं. दहा मिनीटांपेक्षा जास्त वेळ प्रेशर पॅन गॅसवर ठेवल्यास भात खाली लागण्याची शक्यता असते.४. मसाले भातात गोडा मसाल्यासोबत ताजा ताजा तयार केलेला मसाला टाकल्यास भातास उत्तम चव येते. यासाठी लवंग, दालचिनी, वेलची, धणे, सुक्या लाल मिरच्या, जिरे या सामग्रीची आवश्यकता असते.

५.अती मसालेदार किंवा अती तिखट मसाले भात खाल्ला जात नाही. त्यामुळे बेताचं मीठ आणि बेताचा मसाला हेच उत्तम मसालेभाताचं सिक्रेट आहे.६. मसालेभातात ताजा कुटलेलाच मसाला हवा, बाहेरचा विकतचा रेडिमेड मसाला नाही.७. मसालेभातासोबत मठ्ठा तर हवाच.८. सगळ्यात महत्वाचा मुद्दा मसालेभात मोकळा असतो पण मऊ असतो. फडफडीत नाही. 

टॅग्स :अन्नमराठीपाककृती