थंडीच्या दिवसांत बाजारांमध्ये ताजे, आंबटगोड आवळे अगदी मोठ्या प्रमाणांत विकायला असतात. हिवाळ्याच्या दिवसांत मुळातच आवळा खाणे पौष्टिक आणि पाचक असते. ऐन कडाक्याच्या थंडीत प्रत्येक घरी आवळ्याचे वेगवेगळे चविष्ट पदार्थ तयार केले जातात. आवळ्याची चटणी, आवळा कँडी, आवळा सुपारी, आवळा ज्यूस असे अनेक झटपट होणारे पदार्थ तयार केले जातात. परंतु काही पदार्थ असे असतात की जे हिवाळ्यात एकदाच तयार करून वर्षभरासाठी स्टोअर केले जातात त्यापैकीच 'आवळ्याचा मोरावळा' हा एक खास पदार्थ. काचेच्या बरणीत भरलेला पिवळाधम्मक, आंबटगोड चवीचा मोरावळा म्हटलं की पटकन तोंडाला पाणी सुटतं(Avla Moravala Recipe).
शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी या काळात आहारात काही पदार्थांचा आवर्जून समावेश केला जातो. इतकेच नाही तर वर्षभरासाठी प्रतिकारशक्ती चांगली राहावी यादृष्टीने या काळात व्यायाम करणे, आहारात जास्तीत जास्त पौष्टीक पदार्थांचा समावेश करणे या गोष्टी आवर्जून केल्या जातात. हिवाळ्यात मिळणाऱ्या ताज्या आवळ्यांपासून वर्षभर टिकून राहील असा 'मोरावळा' (Amla Murabba Recipe) आपण घरच्याघरीच तयार करु शकतो. मोरावळा चवील उत्तम असतो जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी मोरावळा असेल तर साधी चपाती भाजी किंवा भात असेल तरी जेवणाची चव अधिक वाढते. आवळ्याचा मोरावळा तयार करण्याची रेसिपी पाहूयात(How To Make Avla Moravala At Home).
साहित्य :-
१. आवळे - १.५ कप (किसलेले)
२. गुळ - २ कप (किसलेला)
३. दालचिनी - २ ते ४ (लहान काड्या)
४. लवंग - ३ ते ४
५. साजूक तूप - १ टेबलस्पून
हिवाळ्यात आवळा खाणं म्हणजे आरोग्यासाठी अमृत, पाहा आवळा खाण्याची ‘ही’ योग्य पद्धत...
कृती :-
१. सगळ्यांत आधी आवळे स्वच्छ धुवून पुसून कोरडे करून घ्यावेत.
२. त्यानंतर किसणीच्या मदतीने आवळे किसून घ्यावेत.
३. आता एक पॅन घेऊन तो मध्यम गरम करून घ्याव. पॅन व्यवस्थित गरम झाल्यावर त्यात साजूक तूप घालून घ्यावे.
४. साजूक तूपात लवंग आणि दालचिनी घालावी. साजूक तूपात लवंग, दालचिनी हलकेच परतून घ्यावे.
५. आता त्यात आवळ्याचा किसलेला किस घालावा. २ ते ४ मिनिटे आवळ्याचा किस साजूक तूपात परतून घ्यावा.
६. आवळ्याचा किस थोडा शिजल्यावर त्यात किसलेला गूळ घालावा. आता सगळे जिन्नस एकत्रित हलकेच परतून घ्यावे.
७. गूळ वितळवून त्या पाकात आवळा शिजवून घ्यावा. ८ ते १० मिनिटे शिजवल्यावर गॅस बंद करून हा आवळ्याचा मोरावळा थोडा थंड होऊ द्यावा.
अशाप्रकारे आवळ्याचा मोरावळा खाण्यासाठी तयार आहे. तयार आवळ्याचा मोरावळा एका काचेच्या बरणीत किंवा हवाबंद कंटेनरमध्ये भरून वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवावा.