दिवसभर आपण शरीराची हालचाल करत असतो, त्यामुळे खाल्लेले अन्न पचते. पण रात्रीच्या वेळी आपण झोपत असल्याने खाल्लेले अन्न पचत नाही. तसेच सूर्यास्तानंतर आपल्या शरीराची शक्तीही क्षीण झालेली असल्याने रात्रीच्या वेळी अगदी हलका आहार घ्यायला हवा असे आपण ऐकतो (Diet Tips). तसेच तसंच काही पदार्थ रात्रीच्या जेवणात आवर्जून टाळायला हव्यात असे आयुर्वेदात सांगितले आहे (Avoid 5 Foods for Dinner Ayurveda). प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. रेखा राधामोनी (Dr. Rekha Radhamony) आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट करत आहाराविषयीच्या काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतात, रात्रीच्या जेवणात कोणते पदार्थ आणि का खाऊ नयेत याविषयी त्या काय सांगतात ते समजून घेऊया...
१. गहू
गव्हाचे पीठ पचायला काहीसे जड असते, त्यामुळे ते पचायला वेळ लागतो. म्हणून रात्रीच्या जेवणात गव्हाची पोळी टाळायला हवी. रात्री खाल्लेले अन्न नीट पचले नाही तर शरीरात आम साचतो आणि त्याचा आपल्याला भविष्यात त्रास होतो. म्हणून रात्री शक्यतो पोळी खाणे टाळावे.
२. दही किंवा योगर्ट
अनेकांना जेवणात दही खाणे आवडते. मात्र सकाळी नाश्त्याच्या वेळी किंवा दुपारच्या जेवणात दही खाणे ठिक आहे. पण रात्रीच्या जेवणात दही खाणे टाळलेलेच बरे. कारण रात्रीच्या जेवणात दही खाल्ले तर कफ आणि पित्ताचा त्रास होण्याची शक्यता असते असे आयुर्वेदशास्त्र सांगते.
३. मैदा
गव्हाप्रमाणेच रिफाईंड फ्लोअर म्हणजेच मैदाही रात्री पचायला जड असल्याने त्याचा रात्रीच्या जेवणात समावेश टाळावा. म्हणून ब्रेड, पिझ्झा, सामोसा, पास्ता, नूडल्स यांसारखे पदार्थ रात्रीच्या जेवणात खाऊ नयेत. त्यामुळे पचनशक्तीवर ताण येण्याची शक्यता असते.
४. गोड पदार्थ किंवा चॉकलेट
अनेकांना जेवणाच्या शेवटी किंवा मधेही गोड खाण्याची सवय असते. गोड पदार्थ पचायला जड असतात. त्यामुळे ते एकवेळ दिवसा खाल्ले तर ठिक, पण रात्री हे पदार्थ टाळलेलेच बरे.
५. कच्चे सलाड
सलाड खाणे चांगले त्यामुळे जेवणात सलाडचा आवर्जून समावेश करायला हवा असे आपण नेहमी ऐकतो. हे जरी खरे असले तरी रात्रीच्या वेळी सलाड खाताना ते कच्चे न खाता शिजवून खायला हवे. त्यामुळे ते पचायला हलके होते.
रात्रीच्या वेळी आपल्या पोटातील अग्नी क्षीण झालेला असतो, खाल्लेले अन्न जर योग्य रितीने पचले नाही तर त्याची अनावश्यक टॉक्सिन्स तयार होतात. यालाच आपण आम म्हणतो. शरीरात आम वाढले तर लठ्ठपणा, डायबिटीस, त्वचेच्या तक्रारी, पोटाच्या तक्रारी, हार्मोन्सचे असंतुलन अशा तक्रारी निर्माण होण्याची शक्यता असते.