वर्षभर शेतात राबून आपल्या सगळ्यांचे पोट भरणाऱ्या बैलाचा सण म्हणजे पोळा. या दिवशी या सर्जा राजाची म्हणजेच शेतकऱ्याच्या सोबत्याची पूजा करण्याची त्याला गोडाधोडाचे खाऊ घालण्याची परंपरा भारतात आणि विशेषत: महाराष्ट्रात आहे. गणपतीच्या काही दिवस आधी येणारा हा सण ग्रामीण भागात आणि शेतकऱ्यांकडे अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी बैलांना स्वच्छ न्हाऊ-माखू घातले जाते आणि त्यांना छान सजवून गोडधोड खायला घातले जाते. वर्षभर हे बैल शेतात आणि बैलगाडीला जुंपलेले असल्याने आपल्याला अन्नपदार्थ खायला मिळतात. तेही अतिशय मुकाट्याने आपल्या मालकाचा हुकूम पाळून तो सांगेल ते काम करत असतात. याच बैलांचा मान म्हणून श्रावण महिन्यात पिठोरी अमावस्येला हा पोळा सण साजरा करण्याची रीत आहे. शहरी भागात बैलाच्या प्रतिकृतीची पूजा करण्याची पद्धत आहे.
पोळ्याला बहुतांश भागात रव्याच्या खिरीचा नैवेद्य दाखवला जातो. रवा पचायला हलका आणि आरोग्यासाठी चांगला असल्याने या दिवशी रव्याची खीर करण्याची रित आहे. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या डेटानुसार 'रवा हा कॅलरीज, कार्ब्स, प्रोटीन, थायामिन, फायबर, फोलेट, रिबोफ्लेविन, लोह, मॅग्नेशियमचा उत्तम स्त्रोत आहे. हे सर्व पोषक तत्व आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. यासाठी आहारात रव्याच्या पदार्थांचा समावेश करणे गरजेचं आहे. यासह रवा वजन कमी करण्यास देखील मदत करू शकते. पाहूयात ही रव्याची खीर करण्याची सोपी-चविष्ट रेसिपी...
साहित्य -
१. बारीक रवा - पाव वाटी
२. तूप - १ चमचा
३. दूध - २ वाटया
४. पाणी - अर्धी वाटी
५. साखर - ४ चमचे
६. जायफळ-वेलची पूड - चवीनुसार
७. केशर - ३ ते ४ काड्या
८. सुकामेवा - आवडीनुसार
कृती -
१. तुपात रवा मंद आचेवर भाजून घ्या.
२. थोडासा गुलाबी रंग आला की त्यात पाणी घालून चांगला शिजू द्या.
३. त्यात साखर, सुकामेवा, जायफळ-वेलची पूड आणि केशर घालून सगळे चांगले मंद आचेवर शिजू द्या.
४. सगळ्यात शेवटी दूध घालून खीर पुन्हा चांगली शिजू द्या.
५. मिश्रण थोडे घट्टसर झाले की गॅस बंद करा चविष्ट खीर तयार