थंडीच्या दिवसांत भूक वाढलेली असते. तसेच सतत काहीतरी गरमागरम आणि चविष्ट खाण्याची इच्छा होते. सारखं वेगळं आणि तरीही पौष्टीक काय करायचं असा प्रश्न तमाम महिलांपुढे असतो. पोहे, उपमा, शिरा, खिचडी हे पदार्थ खाऊन आणि करुनही कंटाळा आलेला असतो. अशावेळी नेहमीपेक्षा थोडे वेगळे, खमंग पदार्थ केले तर घरातील सगळेच आवडीने खातात. बाजरी हे थंडीच्या दिवसांत आवर्जून खाल्ले जाणारे तृणधान्य. बाजरी उष्ण असल्याने थंडीच्या काळात शरीराला उष्णता मिळण्यासाठी बाजरी खाल्ली जाते (Bajari wada Winter special breakfast recipe).
बाजरीची भाकरी, बाजरीचे डोसे, बाजरीची खिचडी असे पदार्थ तर आपण अनेकदा करतो. पण बाजरीचे वडे आपण फारसे ट्राय केलेले नसतील. अतिशय चविष्ट, चमचमीत लागणारा हा पदार्थ करायलाही फार अवघड नाही. तसंच मुलांच्या खाऊच्या डब्यात, नाश्त्याला, ६ वाजताच्या स्नॅक्सला असे आपण हे वडे कधीही खाऊ शकतो. भाजणीचे वडे जितके खुसखुशीत आणि खमंग लागतात तितकेच हे वडे छान लागत असल्याने थंडीच्या दिवसांत हे वडे तुम्ही नक्की ट्राय करुन पाहा.
साहित्य -
१. बाजरी पीठ – १ वाटी
२. गव्हाचं पीठ – पाव वाटी
३. तांदळाचं पीठ – पाव वाटी
४. दही - पाव वाटी
५. लसूण-मिरची पेस्ट – १ चमचा
६. धणेजीरे पावडर – अर्धा चमचा
७. तिखट – अर्धा चमचा
८. हळद – पाव चमचा
९. तीळ – १ चमचा
१०. मेथी किंवा कोथिंबीर – १ वाटी (बारीक चिरलेली)
११. तेल – २ वाट्या
१२. मीठ - चवीनुसार
कृती -
१. सगळ्यात आधी बाजरीचे पीठ, गव्हाचे पीठ आणि तांदळाचे पीठ एकत्र करायचे.
२. यामध्ये लसूण मिरचीची पेस्ट, धणेजीरे पावडर, तिखट, मीठ, तीळ हळद आणि दही घालायचे.
३. नंतर यामध्ये दही, थोडं तेल आणि पाणी घालायचे.
४. सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर किंवा मेथी आवडीनुसार घालायची.
५. अंदाजे पाणी घालून हे पीठ घट्टसर मळून घ्यायचे.
६. हाताला तेल लावून या पीठाचे हातावरच थोडे जाडसर वडे थापून मग ते तेलात तळायचे.
७. हे गरमागरम वडे दही, चटणी किंवा अगदी नुसतेही फार छान लागतात.