हिवाळा म्हटलं की, वातावरणातल्या वाढत्या गारठ्यासह तुम्हाला काहीतरी गरम, चटपटीत खाण्याची इच्छा होते. अशावेळी आपण गरमागरम भाजी, वडा, मिसळ पाव यांसारख्या पदार्थांवर चांगलाच आडवा हात मारतो. गार हवेमुळ गरम खाल्लेले किंवा प्यायलेले चांगले असले तरी चटपटीत खाण्याचा शरीराला नक्कीच त्रास होऊ शकतो. जिभेला हे पदार्थ छान लागत असले तरी ते पचायला जड असतात. याशिवाय हवेतील बदलामुळे सर्दी, ताप आणि खोकल्याचाही त्रास या दरम्यान सर्व वयोगटातील लोकांना होतो. अशावेळी जर घरच्या घरी उपलब्ध साहित्यात काहीतरी खमंग व पौष्टिक करता आलं तर किती बरं होईल असा विचार आपल्या मनात येऊन जातो. थंडीच्या दिवसात बाजरी व मेथी वापरून तुम्ही गरमागरम पुऱ्या तयार करू शकता. या पुऱ्या तुम्ही वाफाळता चहा किंवा सॉस, चटणी आणि दह्यासोबत खाऊ शकता. बाजरी व मेथीच्या पुऱ्या कशा करायच्या याची सोपी कृती समजून घेऊ(Bajra & Fenugreek Puri Recipe).
साहित्य :
१. मेथी - एक कप (बारीक चिरलेली)
२. कोथिंबीर - १ टेबलस्पून
३. आलं - १/२ टेबलस्पून
४. मिरची - १ टेबलस्पून
५. बाजरी पीठ - दोन कप
६. वाटी बेसन - अर्धा कप
७. ओवा - १/२ टेबलस्पून
८. हिंग - चिमूटभर
९. हळद - चिमूटभर
१०. मीठ - चवीनुसार
११. धणे पावडर - १/२ टेबलस्पून
१२. गोडा मसाला - १ टेबलस्पून
कृती -
१. सर्वप्रथम एका भांड्यात निवडून धुऊन चिरलेली मेथी, बारीक चिरलेली कोथिंबीर, आलं, मिरची, बाजरी पीठ, ओवा, हिंग, हळद, मीठ, धणे पावडर, गोडा मसाला हे सर्व एकत्र करून घट्टसर पीठ भिजवून घ्या.
२. या भिजविलेल्या पिठाच्या छोट्या - छोट्या पुऱ्या लाटून घ्या.
३. एका छोट्या कढईत तेल गरम करत ठेवा. तेल जोपर्यंत तापून गरम होत नाही तोपर्यंत त्यात पुऱ्या सोडू नका.
४. गरम तेलात या पुऱ्या दोन्ही बाजूंनी खरपूस तळून घ्या.
पौष्टिक बाजरी - मेथीच्या पुऱ्या तयार आहेत खायला.