Join us  

थंडीत नाश्त्याला बनवा गरमागरम बाजरी वडे, ट्राय करा झटपट होणारी पौष्टीक- पारंपरिक रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2023 3:30 PM

Bajri Wada Authentic Maharashtrian winter special Recipe : एकदा हे वडे खाल्ले तर त्यावर ताव मारल्याशिवाय थांबताच येत नाही.

थंडीच्या दिवसांत शरीराला जास्त ऊर्जेची आवश्यकता असते. म्हणून आहारात तीळ, गूळ, बाजरी, सुकामेवा अशा उष्ण गोष्टींचा समावेश आवर्जून करायला सांगितला जातो. त्याप्रमाणे आपण आहारात काही बदल आवर्जून करतो. एरवी उष्ण म्हणून न खाल्ली जाणारी बाजरी या काळात मात्र खाल्ली जाते. बाजरीची भाजणी, बाजरीची खिचडी, भाकरी असे एक ना अनेक पदार्थ आपण थंडीत करतो. पण यापेक्षा थोडा वेगळा चविष्ट आणि चमचमीत असा पदार्थ आज आपण पाहणार आहोत. बाजरीचे वडे ही पारंपरिक रेसिपी असून थंडीच्या दिवसांत आपण हे वडे आवर्जून करायला हवेत. नाश्त्याला किंवा मधल्या वेळेला खाण्यासाठी हा उत्तम पर्याय असून हे वडे करायलाही अतिशय सोपे आहेत. एकदा हे वडे खाल्ले तर त्यावर ताव मारल्याशिवाय थांबताच येत नाही. यासाठी लागणारे जिन्नस आणि ते करण्याची कृती नेमकी काय आहे ते पाहूया (Bajri Wada Authentic Maharashtrian winter special Recipe)...

साहित्य -

१. बाजरीचे ओबडधोबड पीठ - २ वाट्या 

(Image : Google)

२. बेसन - अर्धी वाटी 

३. तीळ - १ चमचा 

४. तिखट - १ चमचा 

५. हळद - अर्धा चमचा 

६. धणेजीरे पावडर - अर्धा चमचा 

७. मीठ - चवीनुसार 

८. कोथिंबीर - अर्धी वाटी 

९. तेल - २ वाटी 

कृती - 

१. एका मोठ्या भांड्यात बाजरीचे आणि बेसनाचे पीठ एकत्र करावे. 

२. त्यामध्ये तीळ, तिखट, मीठ, हळद, धणेजीरे पावडर घालावे.

३. यामध्ये गरम पाणी घालून पीठ चांगले घट्टसर मळून घ्यावे.

४. शेवटी यात कोथिंबीर आणि थोडं तेल घालून हे मळलेलं पीठ मुरण्यासाठी झाकून ठेवावे.

५. पोळपाटावर किंवा हातावर एकसारखे पातळ वडे थापून ते तापलेल्या तेलात तळून घ्यावेत.

६. हे गरमागरम वडे दह्यासोबत किंवा नुसतेही अतिशय छान लागतात. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.