केळ खाणं आरोग्यासाठी फायदेशीर. प्रामुख्याने आहारात पिकलेल्या केळींचा समावेश केला जातो पण आरोग्यदृष्ट्या पिकलेल्या केळापेक्षाही कच्चं केळ आरोग्यासाठी जास्त फायदेशीर असतं.. कच्च्या केळाचा समावेश आहारात भाजीच्या स्वरुपात केला जातो. कच्च्या केळाची भाजी करताना मसाल्यांचा, तेलाचा जास्त वापर केल्यानं कच्च्या केळातील पौष्टिकता लोप पावते. भाजीच्या स्वरुपातही कच्च्या केळातली पौष्टिकता अबाधित राखण्यासाठी कच्च्या केळाची कमी मसाले आणि कमी तेल वापरुन भाजी करावी. अशी भाजी केली तर ती चविष्ट कशी लागेल असा प्रश्न पडलेल्यांनी केळाचं भरीत अवश्य खावं. कच्च्या केळाचं भरीत चवीला पौष्टिक आणि आरोग्यास फायदेशीर ठरतं.
Image: Google
कच्च्या केळाचं भरीत कसं करावं?
कच्च्या केळाच्या भरताला चोखा असं देखील म्हणतात. केळाचं भरीत दोन प्रकारे करता येतं. भरीत करण्यासाठी केळी आधी बटाट्याप्रमाणे उकडून घ्यावी. केळी उकडताना आधी ती धुवून घ्यावी. एका भांड्यात केळी आणि थोडं पाणी घ्यावं. कुकरला एक शिट्टी घ्यावी. गॅसची आच मंद करावी. मंद आचेवर केळी पाच मिनिटं शिजू द्यावी. पाच मिनिटानंतर गॅस बंद करावा. कुकरची वाफ जिरल्यावर उकडलेली केळी बाहेर काढून थंड होवू द्यावी.
केळी थंड झाल्यावर केळीची साल काढून टाकावी. उकडलेलं केळ कुस्करुन घ्यावं. कुस्करलेल्या केळामध्ये हिरवी मिरची बारीक (चिरुन किंवा वाटून), बारेक चिरलेली कोथिंबीर आणि कांदा घालावा. हे सर्व नीट मिसळून घ्यावं. वरुन थोडा ओवा, सैंधव मीठ आणि साधं मीठ घालावं. या पध्दतीनं केळाचं भरीत करताना थोडंही तेल लागत नाही.
Image: Google
केळाचं भरीत दुसरी पध्दत
केळाचं भरीत आणखी रुचकर करण्यासाठी केळी पहिल्या पध्दतीनं उकडून घ्यावा. त्या सोलून कुस्कराव्यात. कढईत थोडं तेल घालावं. तेल गरम करावं. तेलात हिंग आणि मोहरीची फोडणी घालावी. नंतर चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून परतून घ्यावं. यात कुस्करलेलं केळ घालावं. फोडणीत ते चांगलं मिसळून परतून घ्यावं. वरुन चिरलेली कोथिंबीर घालावी. दोन्ही पध्दतीनं केलेलं केळाचं भरीत छान लागतं आणि आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं.
Image: Google
कच्च्या केळाचं भरीत खाल्ल्याने..
1. कच्च्या केळाची मसालेदार आणि तेलकट भाजी टाळून केळाचं भरीत खाल्ल्यास आरोग्यास फायदा होतो. केळाच्या भरतात कमी उष्मांक असतात आणि फायबर जास्त असतं. फायबर जास्त असल्यानं चयापचय सुधारत आणि पचन क्रिया सुलभ होते. तसेच फायबर पचायला वेळ लागतो पण तुलनेत फायबरचं प्रमाण जास्त असलेलं केळाचं भरीत खाल्ल्यानं पोट भरपूर वेळ भरलेल राहातं. मध्ये मध्ये सारखी भूक लागत . यामुळे वजन नियंत्रित राहाण्यास मदत होते.
2. कच्च्या केळातील फायबरचा उपयोग केवळ वजन कमी करण्यासाठीच होतो असं नाही तर हदयाच्या आरोग्यासाठीही फायबर महत्वाचं असतं. कच्च्या केळाचं भरीत करताना तेल अगदीच कमी लागत असल्यानं कोलेस्ट्रेराॅल नियंत्रित राहातं. केळाच्या भरतात पोटॅशियमचं प्रमाण जास्त असल्याने रक्तवाहिन्या सुदृढ राहातात आणि ह्दय सुरक्षित राहातं.
Image: Google
3. कच्च्या केळाचं भरीत खाल्ल्यानं रक्तातील साखर नियंत्रणात राहाते. कच्च्या केळातील ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यानं कच्च्या केळाचं भरीत हळू हळू पचतं त्यामुळे रक्तातील साखर एकदम वाढत नाही.
4. आतड्यांचं कार्य सुरळीत करण्यासाठी कच्च्या केळाचं भरीत फायदेशीर असतं. बध्दकोष्ठतेची समस्याही दूर होते.
5. कच्च्या केळाच्या भरतात जीवनसत्व आणि खनिजांची मात्रा जास्त असते. या भाजीतून क आणि ब6 जीवनसत्व मिळतं. केळाचं भरीत खाल्ल्यानं रोगप्रतिकारशक्ती वाढते. या भाजीतून ॲण्टिऑक्सिडण्टस मिळतात त्यामुळे शरीराच फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण होवून मोठ्या आजारांचा धोका कमी होतो. ब6 हे जीवनसत्व हदय आणि मेंदूचं आरोग्य निरोगी ठेवतं.