- वैद्य विनय वेलणकर
वर्षभर उपलब्ध असणारे आणि सर्वसामान्यांना परवडणारे फळ म्हणजे केळ. भारतात सर्वत्र केळी पिकतात. केळी उत्पादनात भारताचा प्रथम क्रमांक लागतो.भारतीय संस्कृतीमधे केळाला, केळीच्या पानाला विशेष महत्त्व आहे. कोणत्याही शुभकार्यामधे केळीचे खुंट बांधतात. केळीच्या पानावर जेवायला वाढण्याची पध्दत आपल्याकडे मंगल कार्यामधे आहे. केळीच्या पानावर जेवल्यामुळे शरीरातील लोहाचे ( रक्ताचे) प्रमाण वाढते. केळीच्या पानावर जेवण जास्तवेळ गरम रहातं. हॉटेलातून डोसा, इडली पार्सल घेवून जाताना केळीच्या पानात बांधून दिल्यामुळे ते बर्याच वेळ गरम राहातं.केळीच्या सालावरुन, आकारावरुन विविध प्रकार पडतात. केळीमधून क, अ आणि ब जीवनसत्त्वं जास्त प्रमाणात मिळतात. पण जास्त प्रमाणात केळी खाल्ल्यास कफ वाढतो.
केळ आणि केळीच्या पानाचे फायदे
* कशामुळेही भाजलं तर त्याठिकाणी केळीची पानं, फुलं कुस्करुन लावल्यास दाह (आग) त्वरीत कमी होतो.* छातीवर, पाठीवर कृमींमुळे पांढरे डाग येतात. बोलीभाषेत त्याला सिरमा म्हणतात. यावर हळद आणि केळीचा लेप लावल्यास पांढरे डाग जातात.* त्वचा आणि केस यांचं आरोग्य राखण्यासाठी केळ उत्तम आहे. ज्यांची त्वचा कोरडी आहे त्यांनी पिकलेले केळ लावल्याने हा कोरडेपणा कमी होतो. त्वचा मृदु, मुलायम होते. चेहेर्यावरचा कोरडेपणा आणि अतिरिक्त स्निग्धपणा घालवण्यासाठी केळाचा उपयोग होतो. त्वचेला केळीतून पोटॅशिअम आणि अ जीवनसत्त्व मिळतं.* केळामधे वयस्थापक गुण ( अँण्टि एजिंग इफेक्ट) आढळतो. रोज एक केळ खाल्ल्यानं हा फायदा मिळतो. प्रकृती बघून केळाचं सेवन करावं.
* केळीच्या पानांचा रस, फुलांचा रस किंवा अर्क डोक्याला लावल्यास केसातला कोंडा , केसांचा कोरडेपणा, बुरशी संसर्ग नाहीसा होतो. केस मऊ होतात. केस काळे, मऊ आणि तुकतुकीत होण्यास यामुळे मदत होते. केसांची वाढ होते.* केळामधे अँण्टिऑक्सिडण्ट परिणाम असल्याने केस चांगले होतात, त्वचा मृदु रहाते आणि केसांची मुळं घट्ट होतात.* केळीच्या पानांची राख लावल्यास शरीरावर येणारे शीतपित्त, कंड ( खाज येणे) यामुळे कमी होते.* वारंवार अतिसार होत असल्यास कच्च्या केळीची भाजी खावी.* संडासवाटे रक्त पडत असल्यास केळफुलांची भाजी खावी किंवा पिकलेलं केळ खावं.* मुतखडा झाल्यास केळ्याच्या बुंध्याचा रस काढून दिल्यास मुतखडा पडून जातो.* अंगावर पांढरं जात असल्यास केळी खावीत.* लग्नामधे नवरा आणि नवरीमुलीला केळ आणि तूप खाण्यास देतात. कारण केळ हे तत्काळ शुक्रवर्धक आहे.* पित्ताचा त्रास होत असेल, मलावरोध होत असल्यास तुप आणि केळ खावं.* तरुण मुला-मुलींचं वजन वाढत नसल्यास केळ खाण्यास द्यावं. नारळाचा कीस, केळ, मध आणि गूळ एकत्र करुन खाल्ल्यास वजन वाढतं. त्वचेची कांती सुधारते आणि बुध्दी चांगली होते. त्वचा रसरशीत होते.( लेखक आयुर्वेदाचार्य आहेत)