Join us  

न शिजवता करा उपवासाचे बटाटा साबुदाणा पापड, घ्या दुप्पट फुलणाऱ्या पापड्यांची सोपी रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2024 3:47 PM

Batata Sabudana Papad Easy Tasty Recipe : तोंडात टाकल्या की विरघळणाऱ्या पापड्यांची झटपट-चविष्ट रेसिपी...

आपल्याकडे चतुर्थी, एकादशी किंवा अगदी मंगळवार, शनिवार, सोमवार नाहीतर नवरात्री यांसारख्या उपवासाला तळणाचे पदार्थ लागतात. तेव्हाच नाही तर एखादवेळी कंटाळा आला तरी आपण विकतचे चिप्स आणण्यापेक्षा घरात तयार केलेल्या आणि तळलेल्या पापड्या खाऊ शकतो. उन्हाळ्याच्या दिवसांत भरपूर कडक ऊन असल्याने या नैसर्गिक स्त्रोताचा वापर करुन आपण वर्षभर टिकणारे वाळवणाचे पदार्थ करुन ठेवू शकतो. घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारे हे तळणीचे पदार्थ केले की बाहेरचे चिप्स किंवा इतर तळणीचे पदार्थ खाल्ले जात नाहीत (Batata Sabudana Papad Easy Tasty Recipe ). 

कमीत कमी कष्टात आणि तरीही स्वच्छतेत केले जाणारे हे वाळवणाचे पदार्थ तब्येतीलाही चांगले असतात. साबुदाणा आणि बटाटा यांपासून अगदी कमी वेळात होणाऱ्या आणि चविष्ट अशा या पापड्या करायला तर सोप्या असतातच. पण त्या चवीलाही अतिशय मस्त लागत असल्याने आपण सहज करु शकतो. वर्ष-दोन वर्ष  टिकणारे या वाळवणाच्या उपवासाच्या पापड्या तळल्यावर त्या इतक्या छान फुलतात की पाहून तर छान वाटतेच पण त्या तोंडात टाकल्या की अगदी सहज विरघळतात. पाहूयात पारंपरिक पद्धतीने साबुदाणा न शिजवता केल्या जाणाऱ्या उपवासाच्या बटाटा-साबुदाणा पापड्यांची खास रेसिपी... 

(Image : Google)

१. साधारण २ वाटी साबुदाणा साध्या पाण्यात ५ ते ६ तासांसाठी भिजवून घ्यायचा. 

२. साबुदाण्याच्या दुप्पट म्हणजे ४ वाटी पाणी उकळून त्यामध्ये भिजवून फुगलेला साबुदाणा घातला आणि पूर्ण १२ तासांसाठी भिजत ठेवायचा. 

३. मोठ्या आकाराचे ४ बटाटे घेऊन ते उकडून, सालं काढून त्याचे तुकडे करायचे. 

४. भिजलेला साबुदाणा आणि बटाटा यांमध्ये कोमट पाणी घालून मिक्सरमधून त्याची बारीक पेस्ट करुन घ्यायची. 

५. यामध्ये आवडीनुसार हिरवी मिरची, जीरे यांची पेस्ट आणि मीठ घालायचे.  ६. ही पेस्ट एकजीव आणि घट्टसर करुन प्लास्टीकच्या कागदावर याचे मध्यम जाडीचे पापड घालायचे. 

७. हे पापड २ ते ३ दिवस उन्हात चांगले कडकडीत वाळवावेत.

८. त्यानंतर हे पापड तेलात तळल्यास ते मस्त फुलतात आणि तोंडात टाकल्यावर विरघळतात.  

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.