तब्येतीच्या अनेक समस्या कमी करायच्या असतील तर रोजच्या जेवणात वरण- भात, भाजी- पोळी, चटणी- लोणचं असे सगळे पदार्थ असणं जेवढं आवश्यक आहे, तेवढंच गरजेचं आहे सलाड आणि कोशिंबीरी (beet root koshimbir) असणं. गाजर- काकडी असे सलाड आवडीने खाल्ले जातात. त्यांची कोशिंबीर नसेल तरी तसेच तोंडी लावले जातात. पण तेच प्रेम मात्र बीटच्या वाट्याला येतंच असं नाही. चव आवडत नसल्याने बीट खाणंच टाळायचं, असं करण्यापेक्षा त्याच्या या २ चवदार रेसिपी (yummy recipes of beet root) करून बघा. बीट पचडी, बीट सलाड किंवा बीट कोशिंबीर असं काहीही तुम्ही त्याला म्हणू शकता. अशा झकास चवीचं बिटाचं सलाड जेवणात असेल तर जेवणाची रंगत आणखी खुलणार यात मात्र शंकाच नाही.
बीट खाण्याचे फायदे (benefits of beet root)
१. बीटमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे पचनाचा त्रास कमी करण्यासाठी बीट अतिशय उपयुक्त ठरतं.
२. बीटमध्ये कॅल्शियम आणि लोह मोठ्या प्रमाणावर असतं. त्यामुळे ॲनिमिया असणाऱ्या व्यक्तींनी नियमितपणे बीट खायला पाहिजे.
३. बीटमध्ये कॅलरीचं प्रमाण खूप कमी असतं. त्यामुळे वेटलॉस करत असाल तरी बीटरुट सलाड चालू शकतं.
४. व्हिटॅमिन बी- १, बी- २ आणि सी बीटमध्ये भरपूर प्रमाणात असतं.
५. बीटमध्ये फॉलिक ॲसिड असल्याने गर्भवती महिलांसाठीही ते फायद्याचं ठरतं.
६. बीटमधून आपल्याला फॉस्फरस, पोटॅशियम आणि मॅग्नशियम मिळतात.
७. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी बीट उपयुक्त ठरते.
कसे करायचे बीटचे सलाड?
रेसिपी १
- या रेसिपीसाठी आपल्याला दही, बीट, तूप, मोहरी, जिरे, हिंग, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ लागणार आहे.
- सगळ्यात आधी एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवा. पाणी उकळत आलं की त्यात किसलेलं बीट टाका. गॅस बंद करा. पातेल्यावर झाकण ठेवून द्या.
- १० मिनिटांनंतर बीटचा किस पाण्यातून बाहेर काढून घ्या. उरलेलं पाणी फेकून देऊ नका. वरण, भाजी किंवा पराठे करण्यासाठी तुम्ही ते वापरू शकता. किंवा त्या पाण्यात थोडं काळं मीठ आणि चाट मसाला टाकला तर ते सूप म्हणूनही पिऊ शकता.
- आता एका बाऊलमध्ये बीटचा उकडलेला किस ४ चमचे घ्या. त्यात २ चमचे घट्ट दही टाका. चवीनुसार मीठ टाका.
- एका छोट्या कढईत तूप, जिरे, मोहरी आणि हिंग टाकून फोडणी करून घ्या. ही फोडणी बाऊलमध्ये टाकली की सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. वरतून कोथिंबीर घाला. चवदार बीट पचडी झाली तयार.
रेसिपी २
- ही रेसिपी आणखी सोपी आहे. यासाठी आपल्याला बीट, कांदा, दही, जिरेपूड, चाट मसाला, कोथिंबीर आणि फोडणीसाठी तेल किंवा तूप, मोहरी आणि हिंग एवढं साहित्य लागणार आहे.
- यासाठी बीटचं साल काढून घ्या आणि ते किसून घ्या. बीट किसण्यासाठी शक्यतो जाड किसणी वापरा जेणेकरून त्याचा किस खूप लगदा होणार नाही.
- बिटाच्या किसमध्ये बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर टाका.
- त्यात थोडंसं दही, चवीनुसार मीठ, चिमुटभर साखर टाका. वरतून तुपाची किंवा तेलाची फोडणी घाला. सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घेतलं की चविष्ट बिटरुट सलाड झालं तयार.