जेवणात कोशिंबीर, भाजी, आमटी सगळं असायला हवं असं आपण नेहमी ऐकतो. सलाडमध्ये फायबर्स असल्याने आरोग्यासाठी सॅलेड खाणे अतिशय चांगले असते. कोशिंबीरीमुळे पोट भरते आणि आपोआपच आपण इतर पदार्थ कमी खातो. इतकेच नाही तर यामध्ये असणाऱ्या फायबरमुळे पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. म्हणूनच आहारात कोशिंबीर असायला हवी असे आहारतज्ज्ञ सांगतात. कधीतरी कंटाळा आला की आपण नुसतेच सॅलेड चिरुन घेतो. तर काहीवेळा नुसते किसून त्यावर मीठ, साखर घालून घेतो (Beetroot Salad Easy Recipe).
पण साग्रसंगीत कोशिंबीर करायची म्हटली की त्यासाठी दाण्याचा कूट, दही किंवा लिंबू आणि जीरं- मिरचीची फोडणी असायलाच हवी. यातही आपण कधी काकडीची कोशिंबीर करतो तर कधी गाजर, कोबी, टोमॅटो, मुळा यांची करतो. मात्र नेहमी फोडणी दिलेली आणि दाण्याचा कूट घातलेली एकाच प्रकारची कोशिंबीर खाऊन आपल्याला कंटाळा येतो. अशावेळी थोडी हटके पण चविष्ट अशी कोशिंबीर जेवणात असेल तर जेवण तर चांगले होतेच पण कोशिंबीर जास्त खाल्ल्याने शरीराला आवश्यक ते घटक मिळण्यासही त्याची चांगली मदत होते. सध्या बाजारात फ्रेश आणि भरपूर भाज्या उपलब्ध असताना थोडी वेगळ्या प्रकारची गाजर-बीटाची कोशिंबीर कशी करायची ते पाहूया....
साहित्य -
१. बीट - १
२. गाजर - १
३. मायोनिज - अर्धी वाटी
४. मीरपूड - पाव चमचा
५. मीठ - चवीनुसार
६. साखर - अर्धा चमचा
७. डाळींबाचे दाणे - अर्धी वाटी
८. कोथिंबीर - पाव वाटी
कृती -
१. बीट आणि गाजराची साले काढून ते किसून घ्यायचे.
२. त्यामध्ये मीठ, साखर आणि मिरपूड घालायची.
३. डाळींबाचे दाणे आणि मायोनिज घालून चांगले एकजीव करायचे.
४. सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची.
५. हे सलाड नुसते खायलाही अतिशय चांगले लागते. इतकेच नाही तर पोळीसोबतही आपण हे सलाड खाऊ शकतो. तिखट नसल्याने लहान मुलेही हे सलाड आवडीने खातात.