Join us  

उन्हाळी सुटी संपण्यापूर्वी करा भेळेचे 3 चटकदार प्रकार, रेसिपी अशी की तोंडाला सुटेल पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2022 2:38 PM

संध्य़ाकाळी खायला सारखं वेगळं काय करणार असा प्रश्न असेल तर हे घ्या भेळीचे ३ वेगळे प्रकार...

ठळक मुद्देचुरमुरे आणि फरसाणशिवायही होऊ शकते भेळ, कशी ते पाहा...रोज संध्याकाळी काय करायचे असा प्रश्न असेल तर घ्या भेळींचे वेगवेगळे पर्याय

भेळ म्हटली की आपल्या तोंडाला पाणी सुटल्यावाचून राहत नाही. आंबट-गोड चवीची ही भेळ उन्हाळ्याच्या दिवसांत तर आपल्याला विशेष आवडते. चुरमुरे, फरसाण आणि चिंचेची आणि हिरवी चटणी, कैरी, कांदा-टोमॅटो आणि भरपूर शेव घातलेली भेळ पाहिली की आपल्या तोंडाला पाणी सुटल्यावाचून राहत नाही. पण नेहमी तीच ती भेळ खाऊन आपल्याला कंटाळा येतो. मुलं घरात असली की सतत भूक-भूक करतात. मुलांना रोज संध्याकाळी काय खायला द्यायचं असा प्रश्न तमाम महिला वर्गापुढे असतोच. अशावेळी वेगवेगळ्या चवीच्या आणि पद्धतीच्या भेळ मुलांसाठी केल्या तर तेही अतिशय आवडीने खातात. पाहूयात भेळीचे असेच ३ हटके आणि सोपे प्रकार...

१. पोहा भेळ

पातळ पोहे किंवा भाजके पोहे यांचा चिवडा आपल्या घरात सहज उपलब्ध असतो. या चिवड्यावर कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, ओलं खोबरं, बारीक शेव आणि लिंबू पिळून दिले की झटपट पोह्याची भेळ तयार. आवडत असेल तर तुम्ही यावर चिंचेचे पाणी घालू शकता. पण ते नसेल तर चाट मसाला आणि लिंबाचा रस यामुळेही या भेळीला छान चटपटीतपणा आणि आंबटपणा येतो. 

(Image : Google)

२. मखाना भेळ

मखाणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात हे आपल्याला माहित आहेच. कॅल्शियमचा उत्तम सोर्स म्हणून मखाणे आवर्जून खाल्ले जातात. थोडी चटपटीत, गोडसर आणि चवदार लागणारी ही भेळ होते पटकन आणि चवीलाही चांगली लागते. उकडलेले बटाटे स्मॅश करुन घ्या. त्यामध्ये जीरे पावडर, मिरपूड, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लिंबाचा रस घाला. यामध्ये परतून घेतलेले मखाणे आणि भाजलेले किंवा तळलेले दाणे घालून हे एकत्र करा. 

(Image : Google)

३. कॉर्न भेळ

मक्याच्या कणसाचे दाणे उकडून घ्या. यावर बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घाला. यावर, मीठ, तिखट, चाट मसाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. त्यावर भरपूर बारीक शेव घालून असतील तर डाळींबाचे दाणे घाला. हिरवी चटणी आणि चिेंचेची चटणी असेल तर तिही यावर छान लागते. अशाप्रकारे नेहमीच्या चुरमुऱ्यांपेक्षा या वेगळ्या प्रकारच्या भेळ नक्की ट्राय करा.    

(Image : Google)

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.