Lokmat Sakhi >Food > आई खाऊ दे, सुटीत अशी भुणभुण सुरू होण्यापूर्वी करा मुगाचे मस्त पौष्टिक लाडू! सोपी रेसिपी

आई खाऊ दे, सुटीत अशी भुणभुण सुरू होण्यापूर्वी करा मुगाचे मस्त पौष्टिक लाडू! सोपी रेसिपी

मुलांच्या मधल्या भुकेसाठी करा पौष्टिक खाऊ; मुगाच्या खमंग लाडुंची सोपी रेसिपी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2022 07:51 PM2022-04-08T19:51:55+5:302022-04-08T19:57:50+5:30

मुलांच्या मधल्या भुकेसाठी करा पौष्टिक खाऊ; मुगाच्या खमंग लाडुंची सोपी रेसिपी!

Before the holiday season begins, make a very nutritious moong dal ladoo. Here is Simple recipe . | आई खाऊ दे, सुटीत अशी भुणभुण सुरू होण्यापूर्वी करा मुगाचे मस्त पौष्टिक लाडू! सोपी रेसिपी

आई खाऊ दे, सुटीत अशी भुणभुण सुरू होण्यापूर्वी करा मुगाचे मस्त पौष्टिक लाडू! सोपी रेसिपी

Highlightsमुगाच्या डाळीचे लाडू करताना आधी डाळ धुवून घेतली तरी चालते. ती धुवून , उन्हात सुकवून मग भाजावी. डाळ धुतली नाही तरीही चालते. मुगाच्या डाळीचे लाडू आंध्र प्रदेशातला लाडुंचा प्रकार आहे. लाडू चवीला खमंग लागतात आणि गुणांनी पोष्टिक असतात. 

मुलांच्या परीक्षा संपत आल्या आहेत. सुट्या लागल्या की भूक लागली भूक लागली अशी भूणभूण आयांमागे सुरु होते.  तेव्हा सारखं काय द्यायचं खायला? असा प्रश्न पडतो. शिवाय मुलांनी पौष्टिक खावं असा आग्रही आयांचा असतो. पण मुलांना  चटपटीत , खमंग काहीतरी हवं असतं. अशा वेळेस पौष्टिक लाडुंचा पर्याय उत्तम ठरतो. रव्याचे, बेसनाचे, रव्या बेसनाचे लाडू आपण नेहमीच करतो. ते खाऊनही मुलांना कंटाळा आलेला असतो. अशा वेळेस पारंपरिक लाडुंचा प्रकार न निवडता वेगळा पर्याय म्हणून मुगाच्या डाळीचे लाडू करुन बघा. 

Image: Google

मुगाच्या डाळीचे लाडू हा आंध्र प्रदेशातील लाडुचा प्रकार आहे. तिकडे मुगाच्या डाळीच्या लाडुंना 'पेसारा सुन्नुडल्लू' असं म्हणतात. मुगाचे लाडू तयार करण्यासाठी फक्त मुगाची डाळ, तूप आणि साखर यांचीच गरज असते.  कोणत्याही डाळीचे लाडू करताना तूप हे जरा जास्त लागतं. त्यामुळे मुगाचे लाडू करतानाही तुपासाठी हात आखडता घेऊ नये. मुगाच्या लाडुंची पौष्टिकता वाढवण्यासाठी साखरेऐवजी गूळ वापरला तरी चालतो. तसेच मुलांच्या आवडीचा सुकामेवाही त्यात घालता येतो. 

Image: Google

कसे करायचे मुगाच्या डाळीचे लाडू?

मुगाच्या डाळीचे लाडू तयार करण्यासठी 1 कप पिवळी मुगाची डाळ, पाव कप पिठी साखर ( ताजी ताजी वाटलेली), पाव कप तूप आणि आवश्यकतेनुसार सुकामेवा घ्यावा. 

मुगाच्या डाळीचे लाडू करण्यासाठी डाळ स्वच्छ निवडून मंद आचेवर सोनेरी रंगावर खमंग भाजून घ्यावी. डाळ भाजायला साधारणत: 15-20 मिनिटं लागतात. डाळ भाजली गेल्यावर गॅस बंद करावा आणि डाळ पूर्णपणे गार होवू द्यावी. 

Image: Google

डाळ गार झाली की मिक्सरमधून रवेदार वाटून घ्यावी. कढईत तूप घालावं. लगेच तुपात डाळीचं पीठ घालावं. मध्यम आचेवर पीठ 10-15 मिनिटं भाजावं. भाजताना ते सतत हलवत राहावं. नाहीतर पीठ कढईला लागून जळण्याची शक्यता असते. पीठ कढईच्या कडा सोडू लागलं आणि पिठाला तूप सुटायला लागल्यावर पीठ भाजलं गेलंय असं समजावं. गॅस बंद करावा. पिठ कोमट होवू द्यावं. कोमट पिठात ताजी ताजी केलेली पिठी साखर घालावी. आधी केलेल्या पिठी साखरेच्या तुलनेत ऐनवेळी केलेल्या पिठी साखरेचे लाडू खमंग लागतात.  भाजलेल्या पिठात पिठी साखर चांगली मिसळून घ्यावी. साखरेच्या गुठळ्या राहाता कामा नये.  यात आवडीचा सुकामेवा बारीक तुकडे करुन मिसळून घ्यावा. मिश्रणाचे लाडू वळावेत.
 

Web Title: Before the holiday season begins, make a very nutritious moong dal ladoo. Here is Simple recipe .

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.