गणपतीची घरोघरी लगबग सुरू झाली आणि एव्हाना बाप्पाला आवडणाऱ्या मोदकांचीही तयारी सुरू झाली असेल. बाप्पाला मोदक आवडतो हे जरी खरे असले तरी त्याबरोबरच त्याच्या हातावर दही भाताचा नैवेद्य आवर्जून दिला जातो. गौरी विसर्जनाच्या दिवशी माहेरवाशिणी पुन्हा लवकर घरी याव्यात म्हणून त्यांनाही दही भाताचा नैवेद्य दाखवण्याची रीत अनेक कुटुंबात आहे. पूर्वी जेवण होत आले की शेवटी आवर्जून घासभर का होईना दहीभात वाढला जायचा. यामागे काही शास्त्रीय कारण असून दहीभात खाण्याचे आरोग्याला भरपूर फायदे असतात. तांदळामध्ये कर्बोदकांचे प्रमाण जास्त असते. म्हणून दहीभात खाल्ल्याने मेंदूत सेरटोनिन जास्त प्रमाणत तयार होते. असे केल्याने मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यास मदत होते. म्हणूनच गणपतीच्या दिवसांत आवर्जून दहीभात केला जातो. पाहूयात खाण्याचे फायदे आणि त्याची झटपट होणारी सोपी रेसिपी (Benefits and Recipe Of Dahi Bhat Curd Rice)...
१. मेंदूची कार्यक्षमता वाढते
दहीभात खाल्ल्याने मेंदूची कार्यक्षमता वाढते असे संशोधनात सिद्ध झाले आहे. मानवी शरीराला आवश्यक असणारे ट्रिप्टोफॅन नावाचे एक रसायन दह्यामध्ये असते. पण हे रसायन मानवी शरीरात तयार होत नाही. शरीरातील इतर घटकांसोबत त्याचे मिश्रण झाल्यावर सेरटोनिन आणि मेलाटोनिन ही रसायने तयार होतात. त्यातील सेरटोनिन मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी अतिशय उत्तम आहे. आपला मूड चांगला होणे, झोप चांगली लागणे, स्मरणशक्ती वाढणे यांसारखे फायदे होतात.
२. तापावर फायदेशीर
ताप आल्यावर दही भात खाणे फायदेशीर ठरते. अनेकदा तापात काही खाण्याची इच्छा होत नाही. मात्र दही भात खाल्याने शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. तसंच दह्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढते.
३. पोट बिघडल्यावर
पोट बिघडल्यावर इतर पदार्थ खाण्यावर बंधन येतात. पण दही भाताने पोट शांत होते. दह्यात चांगले बॅक्टेरीया असल्याने पोटाचे बिघडलेले तंत्र ताळ्यावर येण्यास मदत होते. बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर काही दिवस दही भाताचे सेवन करा. त्यात भरपूर प्रमाणात चांगले बॅक्टेरीया असतात. त्यामुळे पचन व्यवस्थित होते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत होते.
४. तणावमुक्ती
दही भात खाल्याने तणाव कमी होतो. त्यात असलेल्या प्रोबायोटिक बॅक्टेरीया, अॅंटी ऑक्सीडेंट आणि गुड फॅट्स यामुळे मूड सुधारण्यास मदत होते.
साहित्य -
१. तांदूळ - २ वाट्या
२. दही - ३ वाट्या
३. कडीपत्ता - ८ ते १० पाने
४. दाणे - अर्धा वाटी
५. उडिद डाळ - पाव वाटी
६. साखर - १ चमचा
७. मीठ - १ चमचा
८. लाल मिरच्या - ३ ते ४
९. तेल - २ चमचे
१०. जीरे - अर्धा चमचा
११. हिंग - पाव चमचा
१२. कोथिंबीर - अर्धा वाटी चिरलेली
१३. डाळींबाचे दाणे - आवडीनुसार
१४. खाराची मिरची - आवडीनुसार
कृती
१. कुकरमध्ये नेहमीप्रमाणे भात शिजवून घ्यायचा.
२. भात शिजल्यानंतर तो थोड्या पसरट भांड्यात मोकळा करुन काढून ठेवायचा.
३. दही थोडे फेटून त्यामध्ये साखर, मीठ घालायचे.
४. तेल चांगले तापवून त्यामध्ये जीरे, हिंग घालायचे.
५. फोडणी तडतडली की त्यामध्ये कडीपत्ता, उडीद डाळ, दाणे आणि लाल मिरची, खाराची मिरची घालून ते सगळे चांगले तळून घ्यायचे.
६. भातावर फोडणी घालून दही घालायचे आणि सगळे एकत्र हलवून एकजीव करायचे.
७. दही भातामध्ये पटकन आळत असल्याने वाढताना हा भात कोरडा किंवा घट्ट झाला असे वाटल्यास तो ओलसर होण्यासाठी थोडे दूध आणि दही घातले तरी चालते.
८. वरुन हिरवीगार कोथिंबीर, डाळींबाचे दाणे घातलेला हा भात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हा भात आवडतो.