Join us  

भाग्यश्री सांगते, उत्तम आरोग्य आणि सौंदर्यासाठी खायलाच हवी ही १ भाजी, ५ मिनीटांत होणारी सोपी रेसिपी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2023 5:08 PM

Benefits and Recipe Of Green Beans by Actress Bhagyashree : झटपट होणारी आणि चविष्ट लागणारी ही भाजी आवर्जून खायला हवी.

भाजी-पोळी आणि भात-वरण हा महाराष्ट्रीयन लोकांचा मुख्य आहार आहे. असे असले तरी आपण भाज्यांमध्ये फळभाज्या, पालेभाज्या, कडधान्ये, डाळी, सॅलेड अशा विविध पदार्थांचा समावेश करुन त्यामध्ये वैविध्य आणायचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक भाजीमध्ये आरोग्यासाठी उपयुक्त असे काही ना काही घटक असतातच. त्यामुळेच आपला आहार चौरस असावा असं आपण म्हणतो. प्रत्येक भाजीतून मिळणारे पोषण आणि त्याचा शरीराला होणारा फायदा लक्षात घेऊन आहारात त्या भाजीचा किती समावेश करायचा हे आहारतज्ज्ञ सांगतात. 

प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्रीही आहार, व्यायाम आणि फिटनेस याबाबत नेहमीच काही ना काही महत्त्वपूर्ण माहिती शेअर करत असते. नुकतीच तिने अशीच एका भाजीबद्दल आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केली असून यामध्ये तिने बिन्स म्हणजेच फरसबी खाण्याचे फायदे आणि या भाजीची अतिशय सोपी अशी रेसिपी सांगितली आहे. तिच्या या पोस्टला इन्स्टाग्रामवर भरपूर लाईक्स आले असून ही भाजी खाण्याचे फायदे कोणते ते पाहूया...

(Image : Google)

फरसबी किंवा बिन्स खाण्याचे फायदे

१. यामध्ये मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असल्याने हृदयाचे कार्य सुरळीत चालण्यास त्याची चांगली मदत होते. 

२. तसेच यात असणारे पोटॅशियम, फायबर यांमुळे रक्तदाब कमी होऊन दाह कमी होतो. 

३. १ वाटी फरसबीमध्ये जवळपास २ ग्रॅम प्रोटीन्स असतात. 

४. ही भाजी व्हिटॅमिन ए, सी, के आणि फोलेट यांचा उत्तम स्त्रोत आहे.

५. कॅलरीजचे प्रमाण कमी असते, फॅटस नसतात आणि साखरेचे प्रमाणही अतिशय कमी असल्याने ही भाजी आरोग्यदायी असते. 

रेसिपी 

साहित्य - 

१. तेल - १ चमचा 

२ जीरं - अर्धा चमचा 

३. ओवा - अर्धा चमचा 

४. तिखट - अर्धा चमचा 

५. धणे पावडर - अर्धा चमचा 

६. मीठ - चवीनुसार 

७. साखर - अर्धा चमचा 

 

८. फरसबी - पाव किलो 

९. ओलं खोबरं - अर्धी वाटी 

१०. हिंग - पाव चमचा

११. कोथिंबीर - अर्धी वाटी

कृती -

१. फरसबी धुवून बारीक चिरुन घ्यायची. 

२. कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये जीरं, ओवा आणि हिंग घालायचं.

३. त्यात फरसबी घालून वरुन धणे पावडर, तिखट, मीठ आणि साखर घालायची.

४. मीठ आणि साखर घातल्यानंतर भाजीला थोडं पाणी सुटतं आणि त्यात ही भाजी चांगली शिजते. 

५. कढईवर झाकण ठेवून त्या झाकणावर थोडं पाणी घालायचं म्हणजे भाजी चांगली शिजते आणि खाली लागत नाही. 

६. भाजी अर्धवट शिजली की त्यावर वरुन ओलं खोबरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. 

७. आवडीनुसार आपण यावर लिंबू पिळू शकतो आणि दाण्याचा कूटही घालू शकतो.

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.भाज्या