मातीच्या भांड्यातला स्वयंपाक हा आता कुतुहलाचा विषय झाला आहे. एखाद्या हॉटेल /रेस्टॉरण्टचं मार्केटिंग करण्यासाठी सध्या मातीच्या भांड्यातली भाजी, मातीच्या भांड्यातली उसळ अशा जाहिराती केल्या जातात. मातीच्या भांड्यातील स्वयंपाक हा शहरी भागात अपवादात्मकरित्या आढळणारी बाब पूर्वी जगण्याचा एक भाग होती. मातीच्या भांड्यातला स्वयंपाक ही सवयीची गोष्ट होती. पण आता आरोग्य सांभाळण्यासाठी मातीच्या भांड्यात स्वयंपाक करा असं सांगावं लागत आहे.आयुर्वेदानुसार मातीच्या भांड्यात केलेला स्वयंपाक आपल्याला अनेक रोगांपासून दूर ठेवतो. मातीच्या भांड्यातल्या स्वयंपाकाच्या चविष्टपणाबद्दलच बोललं जातं. पण त्याच्या आरोग्यदायी फायद्यांबद्दल मात्र बोललं जात नाही. खरंतर मातीच्या भांड्यात शिजवलेलं अन्न हे चविष्ट तर असतंच शिवाय पौष्टिकही असतं. सगळीच भांडी ही मातीची ठेवणं आणि त्यात सर्व स्वयंपाक रांधणं हे आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अवघड आहे. पण आयुर्वेद तज्ज्ञ म्हणतात किमान मातीच्या तव्यावर पोळ्या केल्या तरी आपल्या आरोग्यास अनेक फायदे मिळतात.
छायाचित्र: गुगल
सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या. त्याचा परिणाम आरोग्यावर होतो आहे. सतत आजारी पडण्याचं प्रमाण वाढलंय. आपलं आरोग्य आहाराच्या माध्यमातून जपण्याला खूप महत्त्व आहे. आणि आपण खात असलेल्या आहारात पोषक तत्त्वं असणं हेही महत्त्वाचं आहे. स्वयंपाकाच्या प्रक्रियेत अनेकदा अन्न घटकातील पोषक घटक वेगवेगळ्या कारणांनी उडून जातात. आणि आपण आवडीनं खात असलेलं अन्न निकस आहे हे आपल्या लक्षातही येत नाही. याचाच परिणाम आरोग्य बिघडण्यावर होतो. म्हणूनच आरोग्य सुधारण्याची एक उत्तम संधी मातीच्या तव्यावर भाजलेली पोळी खाण्याने मिळते. मातीच्या तव्यावर भाजलेली पोळी खाल्ल्यानं पचन क्रिया तर सुधारतेच सोबत इतर अनेक आजारंवरही ही मातीच्य तव्यावरली पोळी फायदेशीर ठरते.
छायाचित्र: गुगल
तव्यावरील पोळी खाण्याचे फायदे.
1. सध्याच्या बैठ्या जीवनशैलीत एका जागी बसून काम करणं अपरिहार्य झालं आहे. ही पध्दत वरवर आरामदायक वाटत असली तरी आरोग्यासाठी मात्र घातक आहे. एका जागी बसून काम केल्यानं पोटात वायू धरण्याची म्हणजेच गॅसेस होण्यची समस्या अनेकांना सतावते आहे. मातीच्या तव्यावरील पोळी खाल्ल्यानं ही समस्या लवकर दूर होते.2. चुकीच्या खाण्यापिण्यामुळे बध्दकोष्ठतेचा त्रास होतो. हा त्रास देखील मातीच्या तव्यावरील पोळी खाल्ल्याने दूर होतो.3. मातीच्या तव्यावर जेव्हा पोळी भाजली जाते तेव्हा पोळीमधे मातीचे तत्त्व शोषले जातात आणि पोळी पौष्टिक होते. मातीच्या तव्यावर भाजल्यानं पोळीमधील पौष्टिकता तर वाढतेच शिवाय तिच्यातील प्रथिनं शाबूत राहातात. अशी पौष्टिक पोळी खाल्ल्यानं अनेक आजारांपासून संरक्षण होण्यास मदत मिळते.4. मातीचा तवा गरम व्हायला वेळ लागतो. एकदा तो गरम झाला की पोळ्य व्यवस्थित भाजल्या जातात. मातीच्या तव्यावर पोळी जळत नाही. तसेच मातीच्या तव्यावर भाजलेल्या पोळ्य लवकर खराबही होत नाही.5. तज्ज्ञ म्हणतात की मातीच्या तव्यावर पोळी भाजल्यानं त्यातील पोषक घटक नष्ट होत नाही. उलट ते सुरक्षित राहातात. आणि पोळीत मातीतील तत्व शिरल्याने पोळीची पौष्टिकता वाढते. याविषयी झालेला अभ्यास सांगतो की, अँल्युमिनिअमच्या भांड्यात स्वयंपाक केल्यास अन्नातील 87 टक्के पोषक घटक नष्ट होतात.पितळाच्या भांड्यामधे स्वयंपाक केल्यास अन्नातील 7 टक्के पोषक घटक नष्ट होतात. कांस्याच्या भांड्यात स्वयंपाक केल्यास अन्नातील 3 टक्के पोषक घटक नष्ट होतात. फक्त मातीचीच भांडी अशी आहेत ज्यात स्वयंपाक केल्यास अन्नातील 100 टक्के पोषक घटक शाबूत राहातात.
छायाचित्र: गुगल
मातीच्या तव्यावर पोळी भाजताना..
1. मातीच्या तव्यावर पोळी भाजताना गॅसची आच मोठी करु नये. यामुळे तवा तडकण्याची शक्यता असते.2. मातीचा तवा वापरताना त्याला पाणी लावायला हवं.3. मातीचा तवा कधीही साबणानं धुवू नये. कारण तवा साबणातील घटक शोषून घेतो.4. मातीचा तवा स्वच्छ करण्यासाठी स्वच्छ कपड्याचा उपयोग करावा.