Join us  

National Tea Day: गवती चहाचा 'चहा मसाला'.. पावसाळ्यात तर अगदी प्रत्येक घरी हमखास हवाच....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2021 1:30 PM

National Tea Day: बाहेर कोसळणारा पाऊस आणि आल्हाददायक गारवा...आहाहा...!! अशा मस्त वातावरणात हमखास आठवतो तो गरमागरम चहा. चहा बनविताना जरा नजाकतीने बनवला आणि त्याला गवती चहा मसाल्याची तरीतरी आणणारी जोड दिली, तर त्या चहाचा आनंद अगदीच निराळा. आता जर गवती चहा मसाला कसा बनवायचा, हा प्रश्न पडला असेल तर औरंगाबाद येथील प्रसिद्ध आहारतज्ज्ञ कांचन बापट यांनी सांगितलेली ही रेसिपी नक्की करून बघा आणि चहाच्या सोबतीने पावसाचा आनंद लूटा.

ठळक मुद्देघट्ट झाकण असलेल्या काचेच्या बाटलीत मसाला भरून ठेवा, जेणेकरून त्याचा सुवास अधिक काळ टिकेेल.हा मसाला खूप जास्त करून ठेवू नका. कारण त्याचा स्वाद हळूहळू कमी होत जातो. एकदा मसाला केला की साधारण दोन महिने पुरेल एवढाच करावा.

पाऊस पडला, वातावरणात थोडी थंडी असली की आपसूकच मस्त मसाल्याचा सुवास येणारा चहा प्यावासा वाटतो. पण बऱ्याचदा चहा मसाला  कसा करायचा, याची व्यवस्थित माहिती नसल्याने मसाला  एकतर  अगदीच मिळमिळीत होऊन जातो किंवा मग फारच उग्र लागतो. यामुळे चहा पिण्याची मजाच  निघून  जाते. दरवेळी अद्रक किसून चहामध्ये टाकण्याचा प्रकारही फारच कंटाळवाणा वाटू लागतो. त्यामुळेच प्रसिद्ध आहारतज्ज्ञ कांचन बापट यांनी सांगितलेलीही अतिशय साधी सोपी रेसिपी ट्राय करा आणि अगदी काही मिनिटांच्या कालावधीतच झटपट बनणारा गवती चहा मसाला तयार करा. 

 

असा करा गवती चहा मसाला

साहित्य

  • सावलीमध्ये वाळवून घेतलेला गवती चहा, तुळस आणि पुदिना.
  • अद्रक किसून वाळवून त्याची तयार केलेली पावडर किंवा मग सुंठ पावडर.  
  • सालासकट घेतलेली विलायची.
  • दालचिनीचे लहान- लहान तुकडे.
  • ५- ६ लवंगा आणि तेवढेच मीरे
  • थोडेसे जायफळ
  • जायपत्री

 

 

गवती चहा मसाला बनविण्याची कृती

  • सगळ्यात आधी खडा मसाला मिक्सरने बारीक करून घ्या. 
  • बारीक केलेल्या मसाल्यामध्ये तुळस आणि पुदीन्याची पाने घाला आणि पुन्हा मिक्सरने फिरवून घ्या. 
  • मिक्सरच्या दुसऱ्या भांड्यात गवती चहाची पावडर करून घ्या. मसाल्याचा स्वाद कमी होऊ नये म्हणून शक्यतो दोन वेगवेगळी मिक्सरची भांडी वापरा. दोन्हीसाठी एकच भांडे वापरले तरी हरकत नाही. 
  • बारीक केलेल्या गवती चहामध्ये वाळलेल्या आल्याची पावडर किंवा सुंठ पावडर टाका, आधी तयार केलेला मसाला टाका आणि पुन्हा एकदा हे मिश्रण एकत्रितपणे मिक्सरने फिरवून घ्या. 
  • एनर्जी देणारा आणि मन रिफ्रेश करणारा चहा मसाला झाला तय्यार..

 

चहा कसा करायचा

  • हा मसाला वापरून चहा करण्याची एक विशिष्ठ कृती कांचन बापट यांनी सांगितली आहे.
  • सगळ्यात आधी पाणी उकळत ठेवा.
  • उकळी आल्यावर त्यामध्ये साखर, चहा पावडर टाका.
  • त्यानंतर एका कपाला साधारणपणे चिमूटभर असा आपण तयार केलेला गवती चहा मसाला टाका आणि पुन्हा उकळी येऊ द्या.

यानंतर तुमच्या आवडीनुसार दूध टाका आणि गवती चहाचा भन्नाट सुगंध देणाऱ्या चहाचा आनंद घ्या. 

 

गवती चहा घेतल्यावर आरोग्याला होणारे फायदे

  • गवती चहा थकवा, ताण- तणाव दूर करतो.
  • मासिक पाळीदरम्यान महिलांना पायात आणि पोटात येणाऱ्या क्रॅम्पचा त्रास कमी करण्यासाठी गवती चहा उपयुक्त ठरतो.
  • गवती चहामध्ये रोगप्रतिकारक शक्ती आहे.
  • कोणत्याही संसर्गापासून वाचविण्यासाठी गवती चहा उपयुक्त ठरतो. 
  • गवती चहाचे नियमित सेवन बीपी कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत करते. तसेच सांधेदुखीसाठी देखील गवती चहा उपयुक्त आहे.  
टॅग्स :अन्नपाककृती