Join us  

Benefits Of Coconut Water : उन्हाळ्यात नारळपाणी पिण्याचे ५ फायदे, उन्हाचा त्रास टाळा- स्वीकारा नॅचरल पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2022 12:30 PM

Benefits Of Coconut Water :भारताच्या जवळपास सगळ्या भागात सहज मिळणाऱ्या नारळ पाण्यात आरोग्यासाठी आवश्यक असे अनेक गुणधर्म असतात.

ठळक मुद्देशरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहण्यासाठीही नारळपाण्याचा चांगला उपयोग होतो. त्वचेचा पोत सुधारण्यासही नारळपाणी पिणे अतिशय फायदेशीर असते.

उन्हाळा म्हणजे अंगाची लाहीलाही आणि सगळीकडून येणारा घाम. डोक्यावर तापणाऱ्या उन्हामुळे आपल्याला पार गळून गेल्यासारखे होते. कधी एकदा हा उकाडा संपतो आणि पाऊय सुरू होतो असे व्हायला लागते. अशावेळी जास्तीत जास्त पाणी पिणे, सरबते, ताक, उसाचा रस यांसारख्या गोष्टींचा आहारातील समावेश वाढवणे या गोष्टी अतिशय फायदेशीर ठरतात. या सगळ्याबरोबरच नैसर्गिक सलाईन म्हणून ओळखले जाणारे नारळ पाणीही उन्हाळ्याच्या दिवसांत आवर्जून प्यायला हवे. (Benefits Of Coconut Water) भारताच्या जवळपास सगळ्या भागात सहज मिळणाऱ्या नारळ पाण्यात आरोग्यासाठी आवश्यक असे अनेक गुणधर्म असतात. हे पूर्णपणे नैसर्गिक पेय असून यामध्ये कोणत्याही प्रकारची साखर नसते आणि नारळपाण्यात जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडंटस असतात. आपल्याला सामान्यपणे जी खनिजे अन्नातून मिळत नाहीत ती खनिजे नारळपाण्यात चांगल्या प्रमाणात असल्याने सर्वच वयोगटातील व्यक्तींनी आवर्जून नारळपाणी प्यायला हवे. 

१. हायड्रेशन 

नारळपाण्यात व्हिटॅमिन आणि खनिजे अतिशय चांगल्या प्रमाणात असतात. त्यामुळे दिवसभर ताजेतवाने राहण्यासाठी आणि शरीरातील पाण्याची पातळी चांगली राहण्यासाठी नारळपाणी अतिशय उपयुक्त ठरते. उन्हाच्या तडाख्यापासून आपले संरक्षण करायचे असेल तर पोषण देणाऱ्या नैसर्गिक पेय असलेल्या नारळपाण्याचे आवर्जून सेवन करायला हवे. 

२. ओराग्याला पोषण देणारे 

२५० मिलीलीटर नारळपाण्यात खालील गोष्टी असल्याने ते आरोग्यासाठी पोषण देणारे असते. 

कॅलरी - ६० कार्बोहायड्रेटस - १५ ग्रॅमसाखर - ८ ग्रॅमकॅल्शियम - आपण दररोज घेतो त्याच्या ४ टक्केमॅग्नेशियम - आपण दररोज घेतो त्याच्या ४ टक्केफॉस्फरस - आपण दररोज घेतो त्याच्या २ टक्केपोटॅशियम - आपण दररोज घेतो त्याच्या १५ टक्के

३. पचनासाठी फायदेशीर 

पाणी प्यायल्याने आपण खाल्लेले अन्न चांगल्यारितीने पचते आणि आपली पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. अन्नातील उपयुक्त घटक रक्तात मिसळण्याचे काम पाण्यामुळे सोपे होते. तर नारळपाण्यात अशणारे फायबर आणि मॅग्नेशियम यामुळे हे काम आणखी चांगले होते आणि पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. 

४. त्वचा नितळ होण्यास उपयुक्त

नारळ पाण्यामुळे केवळ आरोग्यालाच फायदा होतो असे नाही, तर त्वचेचा पोत सुधारण्यासही नारळपाणी पिणे अतिशय फायदेशीर असते. १०० ग्रॅम नारळपाण्यातून  १० मिलीग्रॅम सी व्हिटॅमिन मिळते, जे त्वचेसाठी अतिशय फायदेशीर असते. 

५. हृदयासाठी फायदेशीर 

नारळपाण्यात पोटॅशियमचे प्रमाण चांगले असल्याने हृदयाची क्रिया सुरळीत होण्यासाठी नारळपाणी फायदेशीर ठरते. आपण आहारात नियमित पोटॅशियम घेतले तर स्ट्रोक येण्याचा आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो. याबरोबरच शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहण्यासाठीही नारळपाण्याचा चांगला उपयोग होतो. 

टॅग्स :अन्नआरोग्यआहार योजनासमर स्पेशल