Join us  

हिवाळ्यात येणारं गोड सिताफळ खायलाच हवं- ४ फायदे, आरोग्यासाठी उपयुक्त रसदार फळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2022 9:55 AM

Benefits of Custard Apple Sitafal : पटकन पिकणारे आणि पिकल्यावर अतिशय गोड लागणारे हे फळ रबडी, मिल्कशेक, आईस्क्रीम यांमध्येही आवर्जून वापरले जाते.

ठळक मुद्देज्यांना आधीपासून हृदयविकार आहेत त्यांनी आणि इतरांनीही सिताफळ खायला हवे.     ज्या ऋतूमध्ये जी फळं बाजारात येतात त्या ऋतूत ती फळं खायला हवीत.

थंडीच्या दिवसांत बाजारात हमखास दिसणारे फळ म्हणजे सिताफळ. अनेक जण त्याच्या बिया काढाव्या लागतात म्हणून हे फळ खाण्याचा कंटाळा करतात. पण असंख्य गुणधर्मांनी युक्त असलेले सिताफळ या काळात खायलाच हवे. चवीला अतिशय गोड आणि सरदार असलेले सिताफळ आवडत नाही असा व्यक्ती शोधून सापडणार नाही. पटकन पिकणारे आणि पिकल्यावर अतिशय गोड लागणारे हे फळ रबडी, मिल्कशेक, आईस्क्रीम यांमध्येही आवर्जून वापरले जाते. प्रत्येत ऋतूमध्ये त्या ऋतूत येणारी फळं खायला हवीत असं आपण नेहमी ऐकतो. त्याचप्रमाणे थंडीच्या दिवसांत बोरं, सिताफळ, पेरु यांसारखी फळं खायला हवीत (Benefits of Custard Apple Sitafal). 

१. हाडांसाठी फायदेशीर 

सिताफळात लोह, कॅल्शियम मॅग्नेशियम, फॉस्फरस हे घटक असल्याने हाडांसाठी हे फळ अतिशय फायदेशीर असते. थंडीच्या दिवसांत हाडे दुखण्याचे किंवा सांधेदुखीचे प्रमाण वाढते त्यावर सिताफळ खाणे फायदेशीर ठरते. 

(Image : Google)

२. रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास उपयुक्त 

विविध आजारांचा सामना करायचा तर आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती चांगली असणे आवश्यक असते. सिताफळामध्ये अँटीऑक्सिडंटसचे प्रमाण जास्त असल्याने लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच प्रतिकारशक्ती वाढण्याच्या दृष्टीने हे फळ फायदेशीर ठरते. 

३. दम्यावर उपयुक्त 

अनेकांना विविध कारणांनी दम्याचा त्रास असतो. सिताफळामध्ये व्हिटॅमिन बी ६ असते जे ब्रोन्कियल इन्फेक्शनपासून दूर ठेवण्यास मदत करते. त्यामुळे ज्यांना दम्याचा त्रास आहे त्यांनी आवर्जून सिताफळ खायला हवे. 

(Image : Google)

४. हृदयासाठी उपयुक्त 

हृदयरोग ही सध्या अतिशय सामान्य समस्या झाली आहे. मात्र हृदयरोगापासून आपले रक्षण करायचे तर आपल्या जीवनशैलीत योग्य ते बदल करण्याची आवश्यकता असते. यामध्ये असलेले पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हृदयाचे कार्य सुरळीत ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे ज्यांना आधीपासून हृदयविकार आहेत त्यांनी आणि इतरांनीही सिताफळ खायला हवे.     

 

टॅग्स :अन्नफळे