Moong dal soup health benefits : रोज घराघरांमध्ये वेगवेगळ्या डाळींच्या भाज्या किंवा वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. तूर डाळीचा वापर सगळ्यात जास्त केला जातो. त्यानंतर जर कोणती डाळ सगळ्यात जास्त खाल्ली जात असेल तर ती म्हणजे मूग डाळ. मूग डाळ इतर डाळींच्या तुलनेत पचायला हलकी आणि पौष्टिक असते. तुम्हीही कधी आजारी असताना तूर डाळीचं पाणी प्यायले असाल. पण अनेकांना हे माहीत नसतं की, तूर डाळीच्या पाण्यापेक्षाही मूग डाळीचं पाणी अनेक पटीनं पौष्टिक आणि फायदेशीर असतं. लहान असो वा मोठे सगळ्यांना या डाळीच्या पाण्याचे फायदे मिळतात. अशात मूग डाळीचं पाणी रोज प्यायल्यास काय काय फायदे मिळतात हे जाणून घेऊ.
मूग डाळीतील पोषक तत्व
मूग डाळींमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, आयर्न, कॅल्शिअम, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि कॉपर भरपूर प्रमाणात असतं. यात कॅलरी कमी असतात. तसेच या डाळींमध्ये भरपूर प्रोटीन, फायबर आणि अॅंटी-ऑक्सिडेंट असतात. त्यामुळे शरीराला या डाळीतून इतके पोषक तत्व मिळतात.
मूग डाळीच्या पाण्याचे फायदे
स्नायू मजबूत होतात
मूग डाळीमध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं. एक वाटी मूग डाळीच्या पाण्यात प्रोटीन १४ ग्रॅम इतकं असतं. त्यामुळे शरीरातील स्नायू मजबूत होण्यास मदत मिळते.
वजन कमी होतं
वेगवेगळ्या कारणांनी जास्तीत जास्त लोक लठ्ठपणामुळे चिंतेत आहेत. लठ्ठपणा कमी करण्यासाठी मूग डाळीचं पाणी खूप फायदेशीर ठरतं. कारण यात कॅलरी कमी असतात. तसेच या डाळींच्या पाण्यानं मेटाबॉलिज्म बूस्ट होतं. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते.
बॉडी डिटॉक्स
रोज जर एक वाटी मूग डाळीचं पाणी प्याल तर शरीरात जमा झालेले विषारी तत्व बाहेर काढण्यास मदत मिळते. सोबतच या डाळीचं पाणी प्यायल्यानं लिव्हर, गॉल ब्लॅडर आणि आतड्या आतून क्लीन होतात. तसेच रक्तही शुद्ध होतं.
डायबिटीसमध्ये फायदेशीर
डायबिटीस असलेल्या रूग्णांना डॉक्टर मूग डाळीचं पाणी पिण्याचा सल्ला देतात. कारण मूग डाळीचं पाणी शरीरात इन्सुलिनचं प्रमाण वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतं. तसेच मूग डाळ ब्लड ग्लूकोजला नियंत्रित ठेवण्यासही मदत करते.
पोटासाठी फायदेशीर
मूग डाळ पचायला खूप हलकी असते. त्यामुळे मूग डाळीचं पाणी पोटासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. कारण यात फायबर भरपूर प्रमाणात असतं. ज्या लोकांना नेहमीच पचनासंबंधी समस्या असतात, त्यांनी नियमितपणे किमान एक वाटी मूग डाळीचं पाणी प्यावं.
कसं बनवाल मूग डाळीचं पाणी?
मूग डाळीचं पाणी तयार करण्यासाठी कुकरमध्ये दोन कप पाणी गरम करा. या गरम पाण्यात मूग डाळ टाका आणि चवीनुसार मीठ टाकून शिजवा. त्यानंतर डाळ चांगली बारीक करा. यातील पाणी वेगळं काढा. तुमचं डाळीचं पाणी पिण्यासाठी तयार आहे.