Join us  

उपवासाचे पदार्थ खाऊन पित्त होते, घ्या ५ पौष्टिक पारंपरिक पदार्थ - करा हेल्दी उपवास...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2024 8:36 AM

Benefits of eating traditional fasting foods : उपवासाला फक्त साबुदाण्याचे पदार्थ खाण्यापेक्षा निवडा इतरही पौष्टिक पर्याय....

आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) निमित्त बहुतेकजण उपवास करतात. उपवास म्हटलं की, फराळाचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. हे पदार्थ जरी वेगवेगळे असले तरी त्यात वापरला जाणारा साबुदाणा हा एक पदार्थ कॉमन असतो. उपवास म्हटलं की साबुदाणा ठरलेलाच असतो. साबुदाण्याची खिचडी, वडे, खीर असे अनेक पदार्थ बनवून आवडीने खाल्ले जातात. असे असले तरीही उपवासाच्या दिवशी आपले पोट रिकामी असते, अशा रिकामी पोटी पचायला फार जड पदार्थ खाल्ले तर त्रास होतो. उपवासाच्या दिवशी जर तुम्ही सारखेच साबुदाण्याचे पदार्थ खाल्ले तर पोटदुखी, अ‍ॅसिडिटी, पचनासंबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात( Nutritional Benefits of Eating Traditional Fasting Food).

उपवासाच्या दिवशी आपण काही हेल्दी पदार्थ खाऊनही उपवास करू शकतो. हेल्दी पदार्थ खाऊन उपवास केल्याने आपल्याला आपल्याला कोणत्याही प्रकारे त्रास होत नाही. उपवासाच्या दिवशी आपण साबुदाण्याव्यतिरिक्त राजगिरा, रताळं, अळीव, डिंक यांसारखे पौष्टिक व हेल्दी पदार्थ खाऊ शकतो. असे पदार्थ उपवासाच्या दिवशी खाल्ल्याने अ‍ॅसिडिटी न होता पोट शांत राहण्यास मदत मिळते. या उपवासाच्या पौष्टिक पदार्थांमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म असतात. असे असले तरीही ते फारसे खाल्ले जात नाहीत, हे पदार्थ नेमके कोणते आणि ते खाण्याचे फायदे काय आहेत ते पाहूयात(Benefits of eating traditional fasting foods).  

साबुदाण्याव्यतिरिक्त तुम्ही उपवासाला हे पदार्थ देखील खाऊ शकता.... 

१. राजगिरा :- उपवासाला आपण राजगिऱ्याची चिक्की, लाडू खातोच. परंतु राजगिऱ्याच्या लाह्या देखील बाजारांत विकत मिळतात. त्या आपण दुधात भिजवून खाऊ शकतो. राजगिरा हा पचायला हलका असतो. राजगिरा खाल्ल्याने वजन वाढत नाही. पावसाळ्यात शरीरातील वात आणि पित्ताचे प्रमाण वाढते. पित्ताची वाढ नियंत्रित ठेवण्यासाठी राजगिरा फायदेशीर ठरतो. राजगिऱ्यामध्ये आयर्न, फॉस्फरस आणि कॅल्शियमचे प्रमाण देखील भरपूर असते. पावसाळ्यात आजारांचे प्रमाण देखील वाढतं. आजार टाळण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणं गरजेचे असते. राजगिऱ्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

२. अळीव :- पावसाळ्यात रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि थकवा जास्त येतो. हा थकवा दूर करण्यासाठी अळीव पाण्यात भिजत ठेवा. २ तासांनी ते कुस्करा आणि गाळून त्याचे पाणी प्यायल्याने आपल्या आरोग्याला त्याचा फायदा होतो. अळीवमध्ये आयर्न, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम ही मिनरल्स आणि बी कॉम्प्लेक्स व कॅरोटीन हे अँटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. सांधेदुखी, कंबरदुखीवर अळीव अतिशय फायदेशीर ठरते. अळीव खाल्ल्याने शरीरातील फॅट्स न वाढता एनर्जी व स्टॅमिना वाढतो. 

आषाढी एकादशी स्पेशल : साबुदाण्याचे वडे नको नी खिचडी नको, फक्त १० मिनिटांत करा उपवासाचा पराठा...

३. डिंक :- बाभळीच्या झाडापासून डिंक मिळतो. शारीरिक मरगळ दूर करून फ्रेशनेस आणण्यासाठी डिंक फायदेशीर ठरते. डिंकामध्ये कार्बोहायड्रेट्स  आणि सोल्युबल फायबर्स असतात त्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास डिंक अतिशय फायदेशीर ठरते. डिंक भाजून फुलवून घ्या मग दुधात घालून तुम्ही खाऊ शकता.

४. शिंगाडा :- शिंगाडा खाल्ल्याने आरोग्याचे पोषण केले जाते. स्नायू मजबूत होण्यासाठी हे फायदेशीर ठरते. शिंगाड्यामध्ये आयोडीन असते, त्यामुळे आयोडीनची कमतरता भरून काढण्यासाठी मदत होते. शिंगाडा थंड पाणी घालून मिक्सरमधून वाटून घ्या आणि दुधासोबत खा.

५. रताळं :- उपवासात पोट भरण्यासाठी रताळं हा उत्तम पर्याय आहे. रताळ्यात कार्बोहायड्रेट्स, कॅलरीजसोबतच इसेन्शियल अमायनो अ‍ॅसिड्स देखील असते.  त्याचबरोबर रताळ्यात आयर्न, फॉस्फरस, मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम, क्रोमियम ही मिनरल्स सुद्धा असतात. यात अँटिऑक्सिडंट्सदेखील फार मोठ्या प्रमाणात असतात. यासाठी रताळं खाणे आरोग्याला फायदेशीर ठरते. रताळं खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होते त्यामुळे वजन कमी करण्यात रताळं मुख्य भूमिका बजावतात. 

त्यामुळे यंदाच्या एकादशीला नुसतेच साबुदाण्याचे पदार्थ खाण्यापेक्षा या पौष्टिक पदार्थांचा देखील आस्वाद जरुर घ्या. उपवासादरम्यान तुम्ही हे हेल्दी पदार्थ नक्की ट्राय करु शकता.

टॅग्स :अन्ननवरात्री उपवास आणि पदार्थ २०२३आषाढी एकादशी