बाजारात सध्या ठिकठिकाणी द्राक्षांचे गढ लगडलेल्या गाड्या उभ्या असलेल्या दिसतात. थंडीचा काळ संपून उन्हाळा सुरू होण्याच्या या काळात द्राक्षं येतात. चवीला आंबट गोड असणारी ही द्राक्ष रसाळ असल्याने कितीही खाल्ली तरी आणखी खावीशी वाटतात. हिरवी द्राक्षं आणि काळी द्राक्षं असे साधारणपणे २ प्रकार आपल्याकडे पाहायला मिळतात. द्राक्षं जास्त खाल्ल गेली तर खोकला होतो किंवा घास धरतो असं आपण नेहमी ऐकतो. पण ही द्राक्षं गोड असतील तर ती अवश्य खायला हवीत. कारण द्राक्षांमध्ये आरोग्यासाठी उपयुक्त असे अनेक घटक असतात. पाहूयात द्राक्षं खाण्याचे एक से एक फायदे (Benefits Of Grapes)...
१. थकवा दूर होण्यास फायदेशीर
द्राक्षांमध्ये विविध प्रकारची व्हिटॅमिन्स, मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह, तांबे असे बरेच घटक असतात. तसेच द्राक्षे गोड असल्याने ती खाल्ल्यानंतर आपल्याला ऊर्जा मिळण्यास मदत होते. त्यामुळे वाढत्या ऊन्हामुळे थकवा आला असेल तर तो द्राक्षांमुळे दूर होण्यास मदत होते.
२. प्रतिकारशक्ती वाढण्यास फायदेशीर
द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी ६, लोह असे बरेच घटक असतात. शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी हे घटक उपयुक्त असतात. त्यामुळे विविध आजारांचा सामना करण्यासाठी द्राक्षं आवर्जून खायला हवीत.
३. रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यास उपयुक्त
रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल या समस्या सध्या अतिशय सामान्य झाल्या आहेत. नैसर्गिकरित्या या समस्या बऱ्या होणे काहीसे अवघड असते. त्यामुळे आहार आणि औषधोपचार यांनीच यावर उपाय करावा लागतो. शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी द्राक्षं आवर्जून खायला हवीत.
४. त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर
आरोग्यासाठी द्राक्षं ज्याप्रमाणे उपयुक्त असतात, त्याचप्रमाणे त्वचा आणि केसांसाठीही द्राक्षं उपयुक्त असतात. द्राक्षामध्ये अँटीऑक्सिडंटस मोठ्या प्रमाणात असल्याने त्वचा आणि केस दिर्घकाळ चांगले ठेवण्याचे काम होते. म्हणून तुम्हाला केस मुलायम आणि त्वचाही ग्लोईंग हवी असेल तर आहारात द्राक्षांचा आवर्जून समावेश करायला हवा.