Join us  

थंडीत खायलाच हवीत न विसरता भरपूर बोरं, ५ फायदे - आरोग्य आणि सौंदर्यासाठी आवश्यक रानमेवा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2022 2:31 PM

Benefits of Jujube Bora Health Tips : बोरं दिसायला लहान पण आरोग्य आणि सौंदर्यासाठी छान

ठळक मुद्देअवघा दिड ते दोन महिने मिळणारी बोरं आवर्जून खायला हवीतप्रतिकारशक्ती वाढण्याबरोबरच, शरीराला ऊर्जा देणारी बोरं डायबिटीस, कॅन्सर यांसारख्या आजारांवर उपयुक्त ठरतात

थंडीच्या दिवसांत बाजारात आवर्जून दिसणारे फळ म्हणजे बोरं. या काळात खाण्या-पिण्याची चंगळ असते म्हटलं तर वावगं ठरणार नाही. फळं, भाज्या, रानमेवा हे सगळेच या काळात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. पण या काळात मिळणाऱ्या बोरांकडे आपले म्हणावे तितके लक्ष जातेच असे नाही. पण लहान दिसणारे हे फळ आवर्जून खायला हवं. आरोग्याच्या विविध तक्रारींवर या फळाचा अतिशय चांगला उपयोग होत असून हा रानमेवा फायदेशीर असतो. यामध्ये अगदी लहान आकाराची गडद लाल रंगाची बोरं मिळतात, तर काहीशी चिकट मध्यम आकाराची आंबट गोड बोरं मिळतात. हिरव्या रंगाची थोडी तुरट तर लाल रंगाची मोठी गोडसर जळगाव जातीची बोरंही बाजारात मिळतात (Benefits of Jujube Bora Health Tips). 

(Image : Google)

बोरांचे हे सगळे प्रकार बाजारात १.५ ते २ महिन्यांसाठीच येतात, तेव्हा हे फळ खायला हवं. काही वेळा बोरात अळ्या असतात म्हणून काही जण बोरं खाणं टाळतात पण नीट पाहून खाल्ले तर किडलेली बोरं आपल्या लक्षात येऊ शकतात. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि सौंदर्याच्याही समस्यांवर उपाय म्हणून बोरांचा रानमेवा अवश्य खायला हवा. आपल्याकडे संक्रांतीच्या वाणातही बोरं द्यायची पद्धत आहे. इतकेच नाही तर राज्याच्या बऱ्याच भागात लहान मुलांचे बोरन्हाणही आवर्जून केले जाते. यामागे कोणतेही विशेष धार्मिक कारण नसून बोरं खाल्ली जावीत हाच त्यामागचा उद्देश आहे. पाहूयात बोरं खाण्याचे ५ फायदे...

१. सी व्हिटॅमिन हे केवळ आंबट फळांमध्ये असते असा आपला समज असतो. मात्र बोरांमध्ये सी व्हिटॅमिन जास्त प्रमाणात असल्याने प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी बोरांचा आहारात आवर्जून समावेश करावा. 

२. वजन कमी करणाऱ्यांसाठी बोरं हे अतिशय उत्तम फळ आहे. कारण यामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असूनही ऊर्जा जास्त प्रमाणात असते. 

३. बोरांमध्ये अँटीॉक्सिडंटसचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे त्वचा आणि केसांच्या समस्या दूर होण्यास मदत होते. इतकेच नाही तर कॅन्सरसारखा असाध्य आजार होऊ नये म्हणूनही ही अँटीऑक्सिडंटस उपयुक्त ठरतात. 

(Image : Google)

४. थंडीच्या दिवसांत पचनशक्ती सुधारावी म्हणून बोरं खाणं फायदेशीर ठरतं. इतकंच नाही तर बद्धकोष्ठता, गॅसेस यांसारख्या संमस्यांवरही बोरं चांगली असतात.

५. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास बोरं खाण्याचा चांगला उपयोग होतो. त्यामुळेच मधुमेहींना आवर्जून बोरं खाण्याचा सल्ला दिला जातो.   

टॅग्स :अन्नफळेआहार योजना