आपण साधारणपणे गोड चवीची फळं नक्की खातो. पण आंबट फळ खायचा आपण कंटाळा करतो. मात्र सगळ्या प्रकारची फळे खाणे आरोग्यासाठी अतिशय चांगले असते. गेल्या काही दिवसांपासून बाजारात लालेलाल लिची दिसायला लागली आहे. लिचीचे सरबत आपण आवडीने पितो पण हे फळ फारसे खात नाही. मात्र लिची आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असून त्यात शरीराला आवश्यक असणारे अनेक घटक असतात. लिचीमध्ये कार्बोहायड्रेट्स, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि आयर्न हे घटक मुबलक प्रमाणात असतात (Benifits of lychee). तसेच लिचीमध्ये नैसर्गिकरित्या गोडवा असल्याने तात्काळ एनर्जी मिळण्यास मदत होते, लिचीमध्ये पाण्याचे प्रमाणही जास्त असते त्यामुळे पोटात थंडावा निर्माण होतो. पाहूयात लिची खाण्याचे फायदे
१. ऊर्जा मिळण्यास फायदेशीर
उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला थकवा आलेला असतो. उन्हाळ्यात आणि पावसाळा सुरू होण्याच्या काळात आपली भूक काहीशी मंदावते. अशावेळेस लिचीच्या सेवनामुळे आपल्याला ऊर्जा मिळण्यास मदत होते. त्यामधील नियासिन घटक शरीरात हिमोग्लोबिन निर्माण करण्यास फायदेशीर ठरतात, त्यामुळे शरीराला तात्काळ उर्जा मिळते.
२. वजन कमी करण्यास उपयुक्त
वाढलेले वजन ही सध्या अनेकांसाठी मोठी समस्या असते. वजन कमी करण्यासाठी लिचीचा अतिशय चांगला उपयोग होतो. लिचीच्या ओक कप गरामध्ये 125 कॅलरीज असतात. तसेच यामध्ये फॅट्सचे प्रमाण कमी असते. या फळात फायबर मुबलक प्रमाणात असल्याने वजन आटोक्यात राहण्यास मदत होते.
३. प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत
शरीराची रोगप्रतिकारक्षमता सुधारण्यास लिची फायदेशीर असते. कपभर लीचीमध्ये सुमारे 136 मिली ग्राम व्हिटॅमिन सी घटक आढळतात. सी व्हिटॅमिनमुळे प्रतिकारशक्ती चांगली राहण्यास मदत होत असल्याने लिचीच्या नियमित सेवनामुळे व्हायरल इन्फेक्शनपासून आपला बचाव करण्यासाठी हे फळ फायदेशीर ठरते.
४. पचनशक्ती सुधारण्यास मदत
लिचीमुळे पचनशक्ती सुधारण्यासही मदत होते. पोट हलके राहण्यास या फाळाचा फायदा होतो. त्यामुळे ज्यांना पचनाशी निगडीत समस्या आहेत अशांनी आहारात नियमितपणे लिचीचा समावेश करायला हवा.
५. त्वचेसाठी उपयुक्त
लिचीमध्ये अँटीऑक्सिडंटस मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे त्वचेवरील काळे डाग, फोड कमी होण्यास या फाळाचा फायदा होतो. वय वाढले की आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या येतात. मात्र नियमित लिची खाल्ल्यास सुरकुत्या येण्याचे प्रमाण कमी होते.