फळं खाणं आरोग्यासाठी अतिशय चांगलं असतं हे आपल्याला माहित आहे. फळांमध्येही विविधता महत्त्वाची असून सगळ्या प्रकारची फळं आवर्जून खायला हवीत. आपण मात्र केळी, सफरचंद फारतर चिकू हीच फळं नियमितपणे खातो. पण त्याशिवायही बाजारात मिळणारी इतर फळं आवर्जून खायला हवीत. गेल्या काही दिवसांपासून बाजारात रामफळ मोठ्या प्रमाणात दिसायला लागले आहे. सिताफळ हे साधारणपणे खाल्ले जाणारे फळ पण रामफळ मात्र आपण तितक्या प्रमाणात खातोच असे नाही. मात्र रामफळ हेही चवीला अतिशय मधुर असणारे फळ आहे. इतकेच नाही तर आरोग्यासाठीही रामफळ अतिशय फायदेशीर असते. पाहूयात आरोग्यासाठी रामफळाचे जबरदस्त फायदे (Benefits Of Ramfal Fruit)...
१. रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास उपयुक्त
विविध आजारांचा सामना करण्यासाठी आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती चांगली असावी असं आपल्याला वाटतं. हिवाळा संपून उन्हाळा सुरू होत असताना साधारणपणे आपण संसर्गजन्य आजारांचा सामना करत असतो. मात्र या आजारांशी लढण्यासाठी आपल्याकडे चांगली रोगप्रतिकारशक्ती असावी यासाठी रामफळ खाणे फायदेशीर ठरते. यामध्ये असणारे विटामिन ए आरोग्यासाठी उपयुक्त असते.
२. डायबिटीससाठी फायदेशीर
साधारणपणे डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींना फळे कमी प्रमाणात खाण्याचा सल्ला जिला जातो. फळांतील फ्रुक्टोजमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची शक्यता असते. मात्र रामफळामुळे साखरेची पातळी न वाढता ती कमी होते. तसेच या फळात खनिजांचे प्रमाणही चांगले असते. त्यामुळे प्रि डायबिटीक आणि डायबिटीक रुग्णांनी आवर्जून रामफळ खायला हवे.
३. त्वचेसाठी फायदेशीर
अनेकदा आपल्याला विविध कारणांनी चेहऱ्यावर मुरुम, पुटकुळ्या येतात. तसेच त्वचेच्या इतर समस्याही उद्भवतात. पण रामफळ खाल्ल्याने या समस्या दूर होतात त्यामुळे त्वचेच्या समस्या दूर व्हाव्यात म्हणून रामफळ आवर्जून खायला हवे.