उन्हाळा आला की आपण सगळेच आंब्याची आवर्जून वाट बघतो. मग हापूस, पायरी, तोतापुरी यांसारखे वेगवेगळे आंबे आवडीने खाल्ले जातात. यासोबतच बाजारात ताडगोळे, फणसाचे गरे, जांभळं अशी इतर फळंही दिसायला लागतात. आंब्यापुढे या फळांना तसा कमी भाव मिळतो. मात्र ही सिझनल फळंही या काळात आवर्जून खायला हवीत. आरोग्यासाठी प्रत्येक फळाचे वेगवेगळे फायदे असल्याने आहारात या फळांचा समावेश आवर्जून करायला हवा. डायबिटीससारख्या समस्यांवरही जांभूळ खाणे फायदेशीर ठरते. जांभळामध्ये हिमोग्लोबिन जास्त प्रमाणात असल्याने ज्या महिलांना अॅनिमियाचा त्रास असतो अशांनी आवर्जून जांभूळ खायला हवे. जांभळामुळे हृदयाचे कार्य सुरळीत होण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी, पोटाच्या तक्रारी दूर करण्यासाठी तसेच त्वचेसाठी जांभूळ खाणे फायद्याचे असते. पाहूयात जांभळं खाण्याचे ५ फायदे (Benefits Of Seasonal Fruit Jamun)...
१. अपचनाचा त्रास होतो दूर
जांभूळ पचनाच्या तक्रारींसाठी फायदेशीर असून जांभळाचा सिझन असताना भरपूर प्रमाणात जांभळं खायला हवीत. यामुळे पोटदुखी, अपचनाचा त्रास कमी होतो. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनीच पोटाच्या समस्यांसाठी जाभळं खायला हवीत.
२. रोगप्रतिकारशक्ती वाढते
थोडी हवा बदलली किंवा संसर्गजन्य आजार सुरू झाले की ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे ते लगेच आजारी पडतात. मात्र जांभळांमुळे रोगप्रतिकारक शक्ती चांगलीच वाढते. जांभळातून पोटॅशियम, लोह, कॅल्शियम हे घटक चांगल्या प्रमाणात मिळतात तसेच रक्ताची कमतरताही दूर होते.
३. शुगर कमी होण्यास फायदेशीर
मधुमेह ही सध्या मोठ्या प्रमाणात वाढलेली समस्या आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यास मधुमेहाची समस्या जटील होत जाते. पण हे साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवल्यास आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. जांभूळ खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते.
४. किडनीस्टोनच्या त्रासासाठी उपयुक्त
जर आपल्याला किडनीस्टोनची समस्या असेल, तर जांभळाचे योग्य प्रमाणात सेवन केले पाहिजे. जांभळाच्या बियांची पावडर यासाठी उपयुक्त ठरते. यासाठी जांभळाच्या बियांची पावडर दही टाकून खाण्याचा सल्ला दिला जातो.
५. शरीर डिटॉक्स करते
जांभळात फ्लावोनाईड्स भरपूर प्रमाणात असतात. हे अँटिऑक्सिडंट शरीरातील हानिकारक फ्री रॅडिकल्स बाहेर टाकण्यास मदत करतात. जांभळं डिटॉक्सिफिकेशनमध्ये मदत करतात. त्यामुळे शरीर शुद्ध करण्यासाठी जांभळाचा आवर्जून आहारात समावेश करायला हवा.