उन्हाळा सुरू होताना ऊसाचा रस पिण्यास सुरुवात करण्यासाठी महाशिवरात्रीचा दिवस खास असतो असं म्हटलं जातं. डोक्यावर तळपतं ऊन असताना अतिशय मधुर चवीचा आणि थंडगार असा हा रस प्यायला की उन्हामुळे आलेला थकवा कुठच्या कुठे पळून जातो. पूर्वी लाकडी गाडीवर माणसं किंवा बैल गोलाकार फिरुन हा रस काढत असत, आता इलेक्ट्रीक मशीन आल्याने हे काम आणखी सोपे झाले. रसाच्या गुऱ्हाळात वाजणारी घंटा ऐकू आली की नकळत आपलं लक्ष त्याठिकाणी जातं. डोक्यावर ऊन तळपत असताना हा गारेगार रस मनाला आणि शरीराला शांती देणारा ठरतो (Benefits Of Sugarcane Juice).
यामध्ये लिंबाचा रस किंवा काळं मीठ घालून पिण्याचीही पद्धत आहे. त्यामुळे रसाचा त्रास न होता तो पचण्यास मदत होते असं म्हणतात. ऊसाचा रस उष्ण असतो किंवा गोड असल्याने शुगर असलेल्या व्यक्तींनी हा रस पिणे शक्यतो टाळायला हवे असे म्हटले जाते. मात्र ऊसाचा रस आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतो. आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. वैशाली शुक्ला यांनी ऊसाचा रस पिण्याचे फायदे सांगितले आहेत, ते कोणते पाहूया...
१. तुम्हाला सतत अॅसिडीटी, सनबर्न, त्वचेवर रॅशेस आणि युरीनरी ट्रॅकचे इन्फेक्शन अशा तक्रारी उद्भवत असतील तर ऊसाचा रस पिणे हा उत्तम उपाय आहे.
२. उन्हाळ्याच्या दिवसांत काहींना कॉन्स्टीपेशनचा त्रास होतो. अशांसाठी ऊसाचा रस पिणे हा उत्तम उपाय आहे. आठवड्यातून २ ते ३ वेळा विशेषत: दुपारच्या वेळी हा रस प्यायल्यास कॉन्स्टीपेशनची समस्या दूर होण्यास मदत होते.
३. लिव्हरचे कार्य सुरळीत चालण्यासाठीही ऊसाचा रस अतिशय उपयुक्त असतो. त्यामुळे याला लिव्हर टॉनिक म्हटले जाते. पचनक्रिया सुधारण्यासाठी हा रस पिणे फायद्याचे ठरते. अँटीऑक्सिडंटस, फायटोन्यूट्रीयंटसचा उत्तम स्त्रोत असलेला हा रस उत्तम कूलंट म्हणून काम करत असल्याने अवश्य प्यायला हवा.