महाशिवरात्री म्हणजे शंकराची पूजा करण्याचा दिवस. वर्षातील महत्त्वाच्या सणांपैकी एक असलेल्या या दिवशी शिवभक्त आवर्जून उपवास करतात. साधारणपणे थंडीचा काळ संपून उन्हाळा सुरू होण्याच्या आधी महाशिवरात्र येते. ऊसाचा रस आपण एरवी पितोच पण महाशिवरात्रीला ऊसाचा रस आवर्जून प्यायला जातो. उन्हाळा सुरू होताना रस पिण्यास सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस खास असतो असं म्हटलं जातं. डोक्यावर तळपतं ऊन असताना अतिशय मधुर चवीचा आणि थंडगार असा हा रस प्यायला की उन्हामुळे आलेला थकवा कुठच्या कुठे पळून जातो. पूर्वी लाकडी गाडीवर माणसं किंवा बैल गोलाकार फिरुन हा रस काढत असत. आता इलेक्र्टीक मशीन आल्याने हे काम आणखी सोपे झाले. मात्र महाशिवरात्रीला ऊसाचा रस पिण्याची पारंपरीक रीत नेमकी का आहे आणि या दिवशी उसाच्या रसाचे महत्त्व काय हे समजून घेऊया (Benefits Of Sugarcane Juice Usacha Ras Mahashivratri 2023)...
१. तहान भागण्यास उपयुक्त
उन्हाळ्याच्या दिवसांत तापमान वाढल्याने आपल्या शरीराची लाहीलाही व्हायला सुरुवात होते. घाम आल्याने आणि उष्णता वाढल्याने आपल्याला सतत तहान लागते. अशावेळी उसाचा रस प्यायला तर काही वेळासाठी आपली तहान भागली जाते.
२. ऊर्जा मिळण्यास फायदेशीर
ऊस हा अतिशय गोड असल्याने हा रस प्यायल्यास उन्हामुळे आलेला थकवा दूर होण्यास मदत होते. उसाचा रस ऊर्जा देणारा असल्याने उन्हामुळे आलेला थकवा निघून तरतरी येण्यास मदत होते.
३. पचनासाठी फायदेशीर
उन्हामुळे अनेकांना पित्ताचा त्रास होतो, हा त्रास कमी होण्यास उसाचा रस फायदेशीर ठरतो. तसेच उन्हाता तडाखा जास्त असेल तर अपचनाच्या तक्रारी उद्भवतात. अशावेळी उसाचा रस प्यायल्यास पोट साफ होण्यास मदत होते.
४. आरोग्यास उपयुक्त घटक
ऊसाच्या रसात कार्बोहाड्रेट, प्रोटीन, आर्यन आणि पोटॅशियम असते. हे सगळे घटक आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे या काळात ऊसाचा रस प्यायल्याने शरीर मजबूत होते आणि आपल्या कार्यक्षमतेतही वाढ होते.
५. मूत्रविकार दूर होण्यास मदत
उन्हाळ्याच्या दिवसांत युरीन इन्फेक्शन ही सामान्य समस्या आहे. अशावेळी उसाचा रस प्यायल्यास लघवीच्या समस्या दूर होण्यास मदत होते. या रसामुळे किडनी साफ राहण्यास व किडनीचे कार्य सुरळीत होण्यास मदत होते.