रताळं हे एक लोकल कंदमूळ असून आपल्याकडे प्रामुख्याने उपवासाच्या वेळी रताळी खाण्याची पद्धत आहे. पण रताळं हे उपवासालाच खातात असं काही नाही. तर एरवीही आपण हे कंदमूळ आवर्जून खायला हवे. थंडीच्या दिवसांत एनर्जी बूस्टर म्हणून काम करणारे रताळे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. रताळ्यांमध्ये लोह, प्रथिने, फायबर, कॅल्शियम, व्हिटॅमिन्स, पोटॅशियम, थायमिन आणि जस्त भरपूर प्रमाणात असते (Benefits of Sweet Potato In Winter).
शरीराला या सगळ्या गोष्टींची आवश्यकता असून एकाच पदार्थातून इतके सगळे घटक मिळत असतील तर उत्तमच नाही का? आता रताळ्याचे कोणकोणते पदार्थ आपल्याला करता येतील असा प्रश्न असेल तर रताळ्याची भाजी, रताळ्याचा कीस, गूळ आणि तूपातील रताळ्याच्या गोड फोडी, रताळ्याची खीर असे वेगवेगळे पदार्थ करता येतात. हे पदार्थ चवीलाही अतिशय छान लागत असल्याने लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने ते खातात. पाहूयात रताळी खाण्याचे फायदे....
१. ऊर्जा देणारा पदार्थ
थंडीच्या दिवसांत शरीर अधिक ऊर्जा खर्च करत असल्याने त्वरीत ऊर्जा मिळण्यासाठी रताळ्याचा अतिशय चांगला फायदा होतो.
२. फायबरयुक्त
रताळ्यामध्ये फायबर जास्त प्रमाणात असल्याने लठ्ठपणा कमी होण्यासाठी रताळी खाण्याचा फायदा होतो. तसेच पीसीओडी, डायबिटीस यांसारख्या समस्यांवरील उपाय म्हणूनही रताळ्याचा फायदा होतो.
३. त्वचेसाठी फायदेशीर
त्वचेचा कोरडेपणा कमी होणे, सुरकुत्यांचे प्रमाण कमी होणे यांसारख्या समस्यांसाठी रताळ्यांचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरते.
४. पचनक्रियेसाठी उपयुक्त
बद्धकोष्ठता किंवा कोठा नीट साफ होण्यासाठी रताळ्याचा अतिशय चांगला फायदा होतो. यामुळे पचनाच्या तक्रारी दूर होण्यास मदत होते. पचनक्रिया सुरळीत असेल तर आरोग्याचे कित्येक प्रश्न सुटतात.
५. श्वसनक्रियेसाठी फायदेशीर
रताळ्यातील पोषक घटक फुफ्फुसांचे कार्य सुरळीत ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे श्वसनाशी संबधित कोणतेही विकार झाले असल्यास किंवा फुफ्फुसांच्या कार्यात अडथळा येत असल्यास रताळी खाण्यास सुरुवात करावी.