Join us  

१० मिनिटांत करा भेंडीचे कुरकुरीत काप, गिळगिळीत-चिकट भेंडीचा मेकओव्हर, भेंडी काप फस्त चटकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2023 11:17 AM

Besan Bhindi Fry Lady Finger Recipe : भरल्या भेंडीसारखी लागणारी पण तरी झटपट होणारी ही भाजी कशी करायची पाहूया

भेंडीची भाजी लहान मुलांना आणि मोठ्यांनाही खूप आवडते. बरेचदा घाईत आपण भेंडीचे बारीक काप करुन दाण्याचा कूट किंवा ओलं खोबरं घालून भेंडीची भाजी करतो. विकेंडला किंवा थोडा वेळ असेल तर आपण भरली भेंडीही करतो. भेंडीमध्ये आरोग्यासाठी उपयुक्त असे बरेच गुणधर्म असतात. कधी कांदा घालून तर कधी नुसती मिरची आणि आमसूल घालूनही ही भाजी छान होते. भेंडीचा चिकटपणा कमी होण्यासाठी काही वेळा आपण ती भाजून घेतो तर काही वेळा भाजी करताना आणखी काहीतरी ट्रिक वापरतो. मात्र झटपट होणारी आणि अतिशय चविष्ट लागणारी अशी भेंडीच्या भाजीची एक वेगळी  रेसिपी आज आपण पाहणार आहोत. भरल्या भेंडीसारखी लागणारी पण तरी झटपट होणारी ही भाजी कशी करायची पाहूया (Besan Bhindi Fry Lady Finger Recipe)...

साहित्य - 

१. भेंडी - अर्धा किलो 

२. बेसन पीठ - १  वाटी 

३. मीठ - चवीनुसार 

(Image : Google)

४. धणेजीरे पावडर - १ चमचा 

५. कांदे - २ बारीक चिरलेले

६. हळद - अर्धा चमचा 

७. तिखट - अर्धा चमचा

८. गरम मसाला - अर्धा चमचा 

९. आमचूर पावडर - अर्धा चमचा 

१०. हिंग - २ चिमूट 

११. तेल - १ डाव 

१२. ओवा - पाव चमचा 

१३. लसूण - ६ ते ८ पाकळ्या 

१४. हिरवी मिरची - ३ ते ४  

कृती -

१. भेंडी स्वच्छ धुवून पुसून कोरडी करुन घ्यावी 

२. त्यानंतर प्रत्येक भेंडीचे उभे ४ ते ६ काप करावेत.

३. या भेंडीवर बेसन पसरुन घालावे, त्यानंतर मीठ, हळद, तिखट, धणेजीरे पावडर घालावे. 

४. या मिश्रणावर थोडेसे पाणी शिंपडून हा मसाला आणि भेंडीचे काप हाताने चांगले एकत्र करुन घ्यावे

५. कढईत तेल घालून त्यामध्ये ही मसाला लावलेली भेंडी घालून परतून घ्यावी.

६. दुसऱ्या कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये जीरे, हिंग आणि ओवा घालून फोडणी तडतडू द्यायची. 

७. मग यात मिरचीचे काप आणि लसणाचे तुकडे आणि बारीक चिरलेला कांदा घालावा. 

८. यामध्ये परतलेली भेंडी घालून मग त्यावर गरम मसाला आणि आमचूर पावडर घालावी. 

९. या भाजीला थोडीशी वाफ आणून गरम पोळीसोबत खायला घ्यावी.

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.