Join us  

गोड खावंसं वाटलं तर १० मिनीटांत करा बेसनाचा चविष्ट हलवा, पाहा सोपी रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2024 6:33 PM

Besan Halwa recipe : प्रसिद्ध शेफ पंकज भदौरीया खास झटपट-सोपी रेसिपी पाहूया

काहीवेळा आपल्याला अचानक आपल्याला जेवणात गोड खाण्याची इच्छा होते. अशावेळी घरात काही असतंच असं नाही. मग एकतर आपण शिरा बनवतो किंवा शेवयांची खीर करतो. पण नेहमी तेच तेच  खाऊन आणि करुन आपल्याला कंटाळा येतो. अशावेळी आपल्याला घरात सहज उपलब्ध असलेल्या सामानात आणि तरीही झटपट होईल असा एखादा पदार्थ हवा असतो. आपण गाजराचा, दुधी भोपळ्याचा किंवा मूगाचा हलवा काही वेळा करतो पण डाळीच्या पीठाचा म्हणजेच बेसनाचा हलवा आपल्याला माहित असतोच असे नाही. बेसनाचे पीठ ही आपल्या घरात सहज उपलब्ध असणारी गोष्ट आहे. याच पीठापासून तयार केला जाणारा अतिशय चविष्ट लागतो. हा हलवा कसा करायचा याबाबत प्रसिद्ध शेफ पंकज भदौरीया यांनी सांगितले असून त्याची झटपट-सोपी रेसिपी पाहूया (Besan Halwa recipe)... 

साहित्य -

१. पाणी - १ कप

२. वेलची – ३ ते ४

(Image : Google)

३. केशर – ८ ते १० काड्या

४. बेसन पीठ – १ वाटी 

५. रवा - २ चमचे 

६. साखर – १ वाटी 

७. दूध – २ चमचे

८. सुकामेवा - आवडीप्रमाणे

कृती -

१. एका भांड्यात पाणी घेऊन त्या पाण्यात वेलची आणि केशर घालून ते गॅसवर उकळायला ठेवायचे.

२. एका कढईमध्ये तूप घ्यायचं आणि त्यात बेसन आणि रवा घालून ते मध्यम आचेवर चांगले परतून घ्यायचे.

३. साधारण ४ ते ५ मिनीटे हे चांगले हलवल्यावर याला बुडबुडे येतील आणि मस्त वास यायला सुरुवात होईल.

४. बेसन आणि रवा चांगला परतल्यावर त्यामध्ये साखर घालायची. 

५. त्यानंतर गरम केलेले पाणी या कढईतील पीठात घालायचे आणि पुन्हा सगळे चांगले एकजीव हलवून घ्यायचे. 

६. साखर आणि पाणी एकत्र घातल्याने हा हलवा मस्त दाणेदार व्हायला मदत होते. 

७. मग यामध्ये २ चमचे दूध घालायचे आणि एका पॅनमध्ये तूपावर सुकामेवा परतून घेऊन तो यावर घालायचा.

८. सगळे चांगले एकजीव करायचे आणि हा गरमागरम हलवा खायला घ्यायचा. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.