चहा म्हणजे अनेकांसाठी अमृत असते. बाहेर पाऊस पडत असेल किंवा कडाक्याची थंडी असेल तर अशावेळी वाफाळता कडक चहा हवाच. दिवसातून ५ ते ७ वेळा चहा घेणारेही आपल्या आजुबाजूला असतात. चहा प्यायल्यावर तरतरी येते, झोप उडते, फ्रेश वाटते असे म्हणत दिवसाची सुरुवात आपण चहानेच करतो. इतकेच नाही तर कोणाला भेटायला गेलो म्हणून, कोणाच्या घरी गेलो म्हणून, मिटींगमध्ये असताना किंवा अगदी काम करुन थकवा आला म्हणून वारंवार चहा घेतला जातो. ताणापासून दूर राहण्यासाठीही अनेक जण चहाचा आधार घेताना दिसतात. सतत चहा कॉफी घेणे आरोग्यासाठी फारसे चांगले नसते त्यामुळे कमीत कमी प्रमाणात या पेयांचे सेवन करावे असे आपल्याला वारंवार सांगितले जाते. पण ते फॉलो करणे आपल्याला म्हणावे तितके शक्य होतेच असे नाही (Best Substitute of Sugar for Tea ).
चहा-कॉफी घेण्यामध्ये सर्वात महत्त्वाची अडचण असते ती साखरेची. चहा किंवा कॉफीमध्ये आपण २ किंवा कधीतरी ३ चमचे साखर घालतो. मात्र अशाप्रकारे साखरेचा चहा किंवा कॉफी घेणे आरोग्यासाठी हानिकारक असते. साखरेतून शरीराचे पोषण तर होत नाहीच पण वजन वाढणे, उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारख्या समस्यांना सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ आणि पोषणतज्ज्ञ शिखा अग्रवाल शर्मा याविषयी महत्त्वाची माहिती देतात. शिखा सांगतात, दिवसातून २ चमचे साखर घेणे म्हणजे वर्षाला ४ किलो वजन वाढवणे. वर्षाला ४ किलो म्हणजे १० वर्षात आपण ४० किलो वजन वाढवतो. आता असे होऊ नये म्हणून तुम्ही साखर सोडण्याचा विचार करत असाल तर त्याऐवजी कोणती गोष्ट वापरता येईल याबाबत समजून घेऊया.
चहातील साखरेला उत्तम पर्याय काय?
ज्येष्ठमध हा साखरेला उत्तम पर्याय होऊ शकतो. आयुर्वेदामध्ये ज्येष्ठमधाला खूप महत्त्व असून तो चवीला थोडा गोडसर असल्याने साखरेसाठी चांगला पर्याय होऊ शकतो. तसेच याचा कोणताच तोटा नसल्याने आपण चहामध्ये ज्येष्ठमध आवर्जून वापरु शकता. साखरेइतका गोडवा नसला तरी एकदा तुम्ही साखरेऐवजी ज्येष्ठमधाचा वापर सुरू केला की तुम्हाला साखरेची गरजच लागणार नाही. ज्येष्ठमध खोकल्यासाठी उपयुक्त असतो, तसेच यामध्ये अंटीऑक्सिडंटसचे प्रमाण चांगले असल्याने आतड्यांच्या समस्या, अल्सर, श्वसनाचे आजार, विषाणूजन्य आजार, दातांची किड यांसारख्या समस्यांवर ज्येष्ठमधाचा फायदा होतो. शिखा सांगतात रोज १ ते ५ ग्रॅम ज्येष्ठमध रोज खाणे सुरक्षित आहे. १ ग्रॅम म्हणजे साधारण १ मोठा चमचा ज्येष्ठमधाची पावडर असते. मात्र ज्येष्ठमधाचा वापर करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेतलेला केव्हाही चांगला असेही त्या सांगतात.