Join us  

विकत आणलेले टोमॅटो लगेच मऊ पडून खराब होतात, ५ सोप्या ट्रिक्स - टोमॅटो राहतील फ्रेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2023 9:51 PM

5 Simple Ways To Keep Tomatoes Fresh For Longer : टोमॅटो लवकर खराब होऊ नयेत म्हणून काही सोप्या आयडिया...

टोमॅटो हा आपल्या रोजच्या स्वयंपाकातील एक महत्वाचा पदार्थ मानला जातो. टोमॅटोशिवाय कोणताही पदार्थ करायचा म्हटल तर तो अधुराच आहे. भारतीय पदार्थांमध्ये टोमॅटो महत्वाची भूमिका बजावतो. डाळ, भाजी, कोशिंबीर यांसारख्या अन्नपदार्थांची चव वाढवण्यासाठी टोमॅटोचा प्रामुख्याने वापर केला जातो. टोमॅटोशिवाय आपण किचनमधल्या कुठल्याही ग्रेव्ही किंवा रस्सेदार पदार्थ बनवण्याचा विचारच करू शकत नाही. प्रत्येक भाजीच्या वाटणासाठी आपण कांदा, लसूण, आलं आणि मसाल्यांसोबत टोमॅटोचा वापर आवर्जून करतोच. लाल-लाल टोमॅटो जितके दिसायला सुंदर असतात, त्यापेक्षाही चवीला छान आणि भरपूर बहुगुणी असतात. टोमॅटो हे चवीला काहीसे आंबट असतात. टोमॅटोमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबरची मात्राही भरपूर असते. 

स्वयंपाक घरापासून ते थेट चमकदार त्वचा मिळवण्यासाठी अशा अनेक कारणांसाठी टोमॅटोचा वापर केला जातो. वर्षभर टोमॅटोच्या दरात चढ-उतार होत असतो. कधी हे एवढे महाग होतात की, घेतानाही विचार करावा लागतो तर कधी फारच स्वस्त असतात म्हणून आपण एकदम किलोंनी टोमॅटोची खरेदी करतो. अशावेळी या टोमॅटोना साठवून कसे ठेवायचे हा प्रश्न पडतो. टोमॅटोची योग्य प्रकारे साठवण केली नाही तर ते खराब होण्याची किंवा पिचकण्याची शक्यता असते. टोमॅटो दिर्घकाळ स्टोअर करुन ठेवण्याची सोपी पद्धत(Best way to keep Tomatoes Fresh for a long time without freezing).

टोमॅटो स्टोअर करण्याच्या सोप्या ट्रिक्स :- 

१. मीठ व हळदीचा वापर करा :- बाजारातून टोमॅटो विकत आणल्यानंतर आठवडाभर ते तसेच चांगले टिकून राहण्यासाठी सोपा उपाय करा. एका भांड्यात पाणी घेऊन त्यात प्रत्येकी १ टेबलस्पून हळद व मीठ घालावे. आता या पाण्यांत टोमॅटो स्वच्छ धुवून घ्यावेत. त्यानंतर पुन्हा एकदा टोमॅटो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावेत. मग स्वच्छ कापडाने पुसून एका वर्तमानपत्रांवर ते टोमॅटो पसरुन ठेवावे. असे केल्याने टोमॅटो आठवडाभर फ्रिजमध्ये न ठेवता देखील चांगले टिकतात. 

२. सुकी माती :- एका मोठ्या भांड्यात संपूर्ण कोरडी झालेली माती भरुन घ्यावी. लक्षात ठेवा माती संपूर्ण कोरडी असली पाहिजे त्यात पाण्याचा अंश नाही याची खात्री करुन घ्यावी. अशा मातीत टोमॅटो पुरुन ठेवावे, मग रोजच्या वापरानुसार एक एक टोमॅटो काढून वापरावा. यामुळे टोमॅटो फ्रेश राहण्यास मदत होते. 

३. पुठ्ठयांच्या जुन्या खोक्यांचा वापर करावा :- आपल्या घरात जर एखादा जुना पुठ्ठयांचा खोका असेल तर त्याचा वापर आपण टोमॅटो ठेवण्यासाठी करु शकतो. बाजारांतून विकत आणलेले टोमॅटो स्वच्छ पाण्याने धुवून मग कोरड्या कापडाने संपूर्णपणे सुकवून मगच या पुठ्ठयांच्या खोक्यांमध्ये भरुन ठेवावेत. 

४. प्लास्टिक कंटेनरच्या करा वापर :- टोमॅटो स्वच्छ पाण्यांत व्यवस्थित धुवून सुती कापडाने पुसून स्वच्छ करुन घ्यावेत. आता एखाद्या हवेशीर प्लास्टिक कंटेनरमध्ये हे टोमॅटो भरुन रेफ्रिजरेटरमध्ये स्टोअर करुन ठेवावे. प्लास्टिक कंटेनर हवाबंद असू नये, हवेशीर असावा त्याला हवा खेळती राहण्यासाठी  २ ते ३ छिद्र असावीत. यामुळे टोमॅटो दिर्घकाळ चांगले टिकतील.       

टोमॅटोची पावडर करून ठेवा, आणि वर्षभर भाजी - आमटीला वापरा, पाहा कशी करायची पावडर...

५. झिप लॉक बॅगेचा वापर करावा :- टोमॅटो दिर्घकाळ चांगले टिकवून ठेवण्यासाठी आपण झिप लॉक बॅगेचा देखील वापर करु शकता. टोमॅटो स्वच्छ धुवून, पुसून या झिप लॉक बॅगेत भरुन ठेवावे. त्यानंतर ही झिप लॉक बॅग रेफ्रिजरेटरमध्ये ठेवून द्यावी. झिप लॉक बॅगमध्ये टोमॅटो स्टोअर करुन ठेवताना ते ओले नाहीत याची खात्री करुन घ्यावी. कारण ओले टोमॅटो झिप लॉक बॅगमध्ये ठेवल्यास ते खराब होण्याची शक्यता असते.     

टोमॅटो साठवून ठेवण्याची योग्य पद्धत :- 

१. बाजारांतून टोमॅटो विकत आणल्यानंतर ते स्वच्छ धुवून घ्यावेत. त्यानंतर प्रत्येक टोमॅटोला असलेला हिरवा देठ काढून घ्यावा. देठ काढल्यानंतर, टोमॅटो साठवताना देठाचा भाग खाली आणि लाल भाग वर राहिल याची काळजी घ्यावी. यामुळे टोमॅटो जास्त काळ ताजे राहण्यास मदत होतेच याशिवाय ते मऊ होऊन लवकर खराबही होत नाहीत.

२. जर तुम्ही टोमॅटोला फ्रिजमध्ये साठवून ठेवणार असाल तर त्याला कागदाच्या किंवा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवायला हवं. कारण त्यामुळं टोमॅटोची चव आणि पोत दोन्ही योग्य राहण्यास मदत होते. याशिवाय बाजारातून टोमॅटो खरेदी करत असताना ताजे आणि काहीसे लाल टोमॅटो खरेदी करायला हवे. कारण ते जास्त काळ टिकतात आणि खराबही होत नाहीत. जास्त पिकलेले किंवा पातळ टोमॅटो विकत घेऊ नये, कारण त्याला किड लागलेली असण्याची शक्यता असते.

टॅग्स :अन्न