बटाटा हा आपल्या भारतीयांचा सगळ्यात आवडता पदार्थ आहे. आपण बटाट्याचे अनेक पदार्थ बनवून त्याचा आस्वाद घेतो. बटाटा हा असा पदार्थ आहे की तो थेट आपल्या पारंपरिक पदार्थांपासून ते हटके स्नॅक्स मध्ये देखील वापरला जातो. शक्यतो सगळ्याच भारतीयांना बटाट्याच्या पिवळ्या भाजी पासून ते अगदी फ्रेंच फ्राईज पर्यंत सगळेच पदार्थ खायला आवडतात. खरंतर सध्याच्या सगळ्याच स्ट्रीट फूडमध्ये व स्नॅक्समध्ये बटाट्याचा भरपूर प्रमाणांत वापर केला जातो. बटाट्याचे असंख्य पदार्थ आपल्या आवडीचे असले तरीही बटाट्याचे फ़्रेंच फ्राईज हा आपल्या खूपच जवळचा आणि मनपसंत पदार्थ आहे.
आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर कोणताही फास्ट फूडचा पदार्थ ऑर्डर करायचा म्हटलं तर सर्वात आधी ऑर्डर दिली जाते ती फ़्रेंच फ्राईजची. सामान्यतः बर्गर, टॅको आणि पास्ता यांसारख्या मुख्य पदार्थांना साइड डिश म्हणून फ्रेंच फ्राईज सर्व्ह केले जातात. सहसा कोणतेही फास्ट फूड फ्रेंच फ्राईज शिवाय पूर्ण होत नाही. फ़्रेंच फ्राईजमध्ये आता वेगवेगळ्या फ्लेवर्सचे फ्रेंच फ्राईज सहज उपलब्ध होतात. अगदी कमी कालावधीत हा विदेशी पदार्थ भारतीयांच्या जीभेवर रेंगाळला आहे. क्रंची, स्पायसी, चिझी असलेला हा पदार्थ स्नॅक्स कॉर्नर, रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर अगदी आवडीने ऑर्डर केला जातो. फ्रेंच फ्राईज हा अनेक पिढ्यांच्या आवडीचा पदार्थ आहे. पण हे फ्रेंच फ्राईज खाल्ल्याने याचा आपल्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो हे तुम्हांला माहित आहे का ?(Beware! Your go-to French fries may be linked to anxiety and depression, new research suggests).
बघा रिसर्च काय सांगतो...
PNAS (Proceedings of the National Academy of Sciences of the United States of America) ने प्रसिद्ध केलेल्या एका संशोधनात असे आढळून आले आहे की, तळलेले अन्न पदार्थ, विशेषत: तळलेल्या बटाट्याचे पदार्थ जसे की फ्रेंच फ्राईज वारंवार खाल्ल्याने नैराश्याचा धोका वाढतो. या संशोधना दरम्यान असे आढळून आले आहे की, फ्रेंच फ्राईज सारखे तळलेले खाद्यपदार्थ जे लोक वारंवार खातात त्यांना अशा खाद्यपदार्थांचे सेवन न करणाऱ्या लोकांपेक्षा १२ % जास्त चिंताग्रस्त समस्या निर्माण होतात. तसेच तळलेले पदार्थ न खाणाऱ्या लोकांच्या तुलनेत तळलेले पदार्थ खाणाऱ्यांना नैराश्याचा तसेच उदासीनतेचा धोका ७ % जास्त असल्याचे आढळून आले आहे. तळलेले पदार्थ हे लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि इतर आरोग्यावरील परिणामांसाठी धोकादायक ठरत आहेत. PNAS जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या रिसर्च नुसार "मानसिक आरोग्यासाठी तळलेले अन्नपदार्थ खाणे हे योग्य नाही".
फक्त ५ मिनिटात होणारे बटाट्याचे क्रिस्पी काप, पदार्थ सोपा पण रोजच्या जेवणाला देतो नवा चमचमीतपणा...
शिल्पा शेट्टीने शेअर केली तिच्या आजीची ‘नीर डोसा’ सिक्रेट रेसिपी, पाहा नेमका कसा करायचा...
मानसिक आरोग्याच्या समस्या विकसित होण्याचा एकूण धोका कमी करण्यासाठी निरोगी जीवनशैली जगणे महत्वाचे आहे. संशोधकांनी नमूद केले की जगभरात नैराश्य आणि चिंतामध्ये अलीकडे वाढ झाली आहे. २०२० मध्ये अनुक्रमे २७.६ % आणि २५.६ % वाढ झाली आहे. जेव्हा तुमच्या पौष्टिक आहाराचा विचार केला जातो तेव्हा पौष्टिक घटकांनी समृद्ध असलेला चौकस आहार घेण्याची शिफारस केली जाते.