गरमागरम छोले - भटुरे ही पंजाबची विशेष खासियत म्हणून ओळखली जाणारी डिश आहे. छोलेसोबत भटुरे हे विशेषतः पंजाबमध्येच बनवले जातात. परंतु आता भारताच्या काही भागांमध्ये देखील छोले - भटुरे आवडीने बनवले व खाल्ले जातात. भारतात ठिकठिकाणी असणारे ढाबे, हॉटेल्स, रेस्टोरंटमध्ये पंजाबी डिश म्हणून छोले - भटुरे अतिशय लोकप्रिय आहे. आपल्याकडे हरभरा जसा बनवला जातो, त्याच पद्धतीने छोले म्हणजे काबुली चणे एका विशिष्ट पद्धतीने बनवले जातात आणि त्याबरोबर खाण्यासाठी मैदा – बटाटा एकत्र करून बनवलेल्या पुऱ्या म्हणजेच भटुरे दिले जातात. बहुतेक पंजाबी घरांमध्ये सकाळचा नाश्ता म्हणून छोले - भटुरे आणि त्यासोबत लस्सी घेतली जाते.
छोले भटुरे हा पंजाबी खाद्यसंस्कृतीचा भाग असला तरी देशीविदेशी याने आपली ख्याती पसरवली आहे . पंजाबी ढाब्यांची शान असलेले हे छोले भटुरे सगळ्यांचे आवडते आहे. भटुरे हा एक पुरीसारखाच प्रकार असतो. पुरीच्याच कुटुंबातील असलेले हे भटुरे खाण्यासाठी फारच सुंदर लागतात. आपण काहीवेळा ढाब्यांवर छोले - भटुरे मनसोक्त खाण्याचा आनंद लुटतो. परंतु हेच भटुरे घरी बनवण्याचा प्रयत्न केला तर ते भटुरे नीट फुलत नाहीत, जास्तीचे तेल पितात, ढाब्यांवर मिळतात तसे चवीचे बनत नाहीत अशा अनेक तक्रारी केल्या जातात. यासाठीच घरच्या घरी सोपी पद्धत वापरून झटपट टम्म फुगणारे मसाला भटुरे कसे बनवायचे याचे साहित्य व कृती समजून घेऊ(Bhatura Recipe : How to Make Best Bhatura Dhaba Style at Home).
साहित्य :-
१. मैदा - २ कप २. रवा - २ टेबलस्पून ३. उकडून किसून घेतलेला बटाटा - १ कप ४. दही - ५ टेबलस्पून ५. हळद - १/२ टेबलस्पून ६. लाल तिखट मसाला - १, १/२ टेबलस्पून ७. धणे पावडर - १ टेबलस्पून ८. गरम मसाला - १/४ टेबलस्पून ९. मीठ - चवीनुसार १०. कोथिंबीर - १ टेबलस्पून ११. तेल - १ टेबलस्पून १२. पाणी - १/४ कप
जाळीदार डोसे, लुसलुशीत इडली हवी? पाहा डाळ तांदूळ प्रमाण गणित, करा परफेक्ट साऊथ इंडियन पदार्थ...
कृती :-
१. सर्वप्रथम एका मोठ्या परातीमध्ये मैदा घेऊन त्यात रवा, उकडून बारीक किसून घेतलेला बटाटा, दही, हळद, लाल तिखट मसाला, धणे पावडर, गरम मसाला व चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, तेल आणि पाणी घालून घ्यावे. २. आता हे सर्व जिन्नस मैद्याच्या पिठात एकजीव करुन घ्यावेत. ३. त्यानंतर गरजेनुसार पाणी घेऊन हे पीठ कणकेप्रमाणे मऊसूत मळून घ्यावे.
अस्सल गावरान झणझणीत झुणका, महाराष्ट्राची पारंपरिक रेसिपी, करायला सोपी खायला चमचमीत...
४. मसाला भटुऱ्याचे पीठ व्यवस्थित मळून झाल्यानंतर त्याचे कणकेच्या गोळ्याप्रमाणे छोटे छोटे गोळे करुन घ्यावेत. ५. आता एक एक गोळा घेऊन त्या गोळ्याचे भटुरे लाटण्याआधी त्यावर थोडेसे तेल लावून घ्यावे. तेल लावल्यानंतरच भटुरा गोल पुरीपेक्षा थोड्या मोठ्या आकारात लाटून घ्यावा. ६. त्यानंतर गरम तेलात हे भटुरे दोन्ही बाजुंनी गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यावेत.
गरमागरम मसाला भटुरे खाण्यासाठी तयार आहेत. हे भटुरे गरमागरम छोले किंवा बटाट्याच्या पातळ रस्सा भाजीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करावेत.