Join us  

कधीच भेंडी न खाणारेही आवडीने खातील कुरकुरीत भेंडी फ्राय; मधल्या वेळच्या स्नॅकसाठी परफेक्ट रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2023 2:48 PM

Bhindi Fry Lady’s Finger Fry Recipe : चिप्ससारखे लागणारे हे भेंडी फ्राय एकदा कराल तर घरात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खूश होतील.

भेंडी ही काहींच्या खूप आवडीची असते तर काहींना ती अजिबात आवडत नाही. भेंडीमध्ये आरोग्यासाठी उपयुक्त असे बरेच गुणधर्म असतात. एकच भाजी करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असल्याने आणि प्रत्येकाच्या हाताला चव वेगळी असल्याने ही एकच भेंडी आपण ३ ते ४ प्रकारे करु शकतो. कांदा घालून, दाण्याचा कूट घालून किंवा नुसती मिरची, आमसूल आणि धणे जीरे पावडर घालून भेंडीची भाजी केली जाते. भेंडी मसाला हा तर अनेकांच्या आवडीचा विषय. तेलावर फ्राय केलेली ही भेंडी मसाला किंवा भरली भेंडी बहुतांश लहान मुलांना आवडते. आज आपण भेंडीचीच थोडी वेगळी रेसिपी करणार आहोत. ज्यांना भेंडी आवडत नाही तेही आवडीने खातील असे हे कुरकुरीत भेंडी फ्राय कसे करायचे पाहूया. चिप्ससारखे लागणारे हे भेंडी फ्राय एकदा कराल तर घरात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खूश होतील (Bhindi Fry Lady’s Finger Fry Recipe). 

साहित्य 

१. भेंडी - अर्धा किलो

२. बेसन - १ वाटी 

३. कॉर्नफ्लोअर - ३ चमचे 

(Image : Google)

४. धणे पावडर - २ चमचे 

५. तिखट - १ चमचा 

६. हळद - १ चमचा 

७. आमचूर पावडर - १ चमचा 

८. गरम मसाला - १ चमचा 

९. मीठ - चवीनुसार

१०. तेल - १ वाटी

कृती 

१. भेंडी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची

२. पुढचे आणि मागचे देठ काढून ४ भागात चिरुन घ्यायची.

३. एका मोठ्या बाऊलमध्ये घेऊन त्यामध्ये बेसन आणि कॉर्नफ्लोअर घालायचे. 

४. यावर आमचूर पावडर, हळद, तिखट, धणे पावडर, गरम मसाला, मीठ घालायचे.

५. मग हाताने हे सगळे मिक्स करायचे, म्हणजे भेंडीला सगळे मिश्रण लागते. 

६. त्यानंतर कढईमध्ये तेल घेऊन ही कोट केलेली भेंडी डीप फ्राय करुन घ्यायची. 

७. ही कुरकुरीत भेंडी जेवताना तोंडी लावायला, चहासोबत स्नॅक्स म्हणून किंवा अगदी येता - जाता खायलाही चांगली लागते. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.